सरन्यायाधीशांच्या 'त्या' टिप्पणीविरोधात डिजिटल आंदोलन

नवी दिल्ली : आघाड्या, गट-तट आणि व्हॉट्सॲप वॉर रूम्सने ओसंडून वाहणाऱ्या भारताच्या राजकीय पटलावर एका अजब आणि अनोख्या डिजिटल पर्वाची सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना कथितपणे ‘झुरळे’ आणि ‘परजीवी’ यांच्याशी केल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. मात्र, या अपमानाचा निषेध केवळ संताप व्यक्त करून न करता, तरुणांनी त्याचे रूपांतर एका अजब राजकीय प्रतिकारात केले आहे. यातूनच सध्या इंटरनेटवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि ‘नॅशनल पॅरासिटिक फ्रंट’ या दोन उपरोधात्मक संघटनांचा उदय झाला आहे.

मराठी तरुण अभिजीत दिपके यांनी १६ मे रोजी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल पक्षाची स्थापना केली. हा पक्ष निवडणूक लढवण्यासाठी नसून केवळ व्यवस्थेविरोधातील एक उपरोधिक आंदोलन आहे. पक्षाने स्वतःला "आळशी आणि बेरोजगारांचा आवाज" घोषित केले असून, "जिथे वाय-फाय चालेल, तिथे आमचे मुख्यालय" अशी अनोखी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर बेरोजगार, २४ तास ऑनलाईन राहणारे आणि सिस्टीमवर राग काढण्याची क्षमता असणाऱ्या तरुणांची या पक्षात भरती सुरू असून, काही तासांतच ७० हजारांहून अधिक तर अवघ्या 3 दिवसात 3 मिलियन फॉलोवर्स मिळवणारी या डिजिटल मोहिमेत जोडले गेले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांनीही या पक्षासोबत ऑनलाइन संवाद साधल्याने याची चर्चा आणखी वाढली आहे.
'सीजेपी'ने प्रसिद्ध केलेला उपरोधात्मक जाहीरनामा देशातील खऱ्या राजकीय आणि सामाजिक समस्यांवर अचूक बोट ठेवतो. निवृत्तीनंतर न्यायाधीशांना राज्यसभा जागा न देणे, पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर दीर्घकालीन बंदी घालणे, मंत्रिमंडळात महिलांना ५० टक्के आरक्षण आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांवर कारवाई करणे, अशा मागण्या यात आहेत. हा पक्ष स्पर्धा परीक्षांचे दडपण आणि महागाईने होरपळणाऱ्या तरुणांचे प्रतिनिधित्व करत आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झुरळांचे पोशाख घालून यमुना नदी स्वच्छता मोहीम राबवत एक जनआंदोलनही उभे केले आहे.

दुसरीकडे, या पक्षाला टक्कर देण्यासाठी ‘नॅशनल पॅरासिटिक फ्रंट’ मैदानात उतरला आहे. संसदेतून गुन्हेगारी हद्दपार करणे, सुशिक्षित लोकप्रतिनिधी असणे आणि पावसाळ्यात नद्या न बनणारे रस्ते तयार करणे, अशा मागण्या करत "खरे परजीवी कोण?" असा उलट सवाल या फ्रंटने व्यवस्थेला केला आहे.

भारतात राजकीय व्यंगचित्रांचा इतिहास जुना असला, तरी 'सीजेपी' आणि 'एनपीएफ'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच 'सहभागी व्यंग' पाहायला मिळत आहे. पूर्वीचे तरुण फलक घेऊन रस्त्यावर उतरायचे, तर आजची डिजिटल पिढी थेट पक्ष स्थापन करून आणि जाहीरनामा प्रसिद्ध करून लाखोंचा पाठिंबा मिळवत आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसली तरी, या संघटनांनी तरुणाईच्या मनातील नैराश्याला विनोदाच्या माध्यमातून एक प्रभावी व्यासपीठ मिळवून दिले आहे.