पंतप्रधान मोदी, शाह, संघ देशद्रोही

राहुल गांधींची टीका : राजकारण तापले

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
20th May, 11:11 pm
पंतप्रधान मोदी, शाह, संघ देशद्रोही

रायबरेली : तुमच्या घरी जेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते येतील आणि ते नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याबद्दल बोलू लागतील, तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगा की, तुमचे पंतप्रधान देशद्रोही आहेत, तुमचे गृहमंत्री गद्दार आहेत आणि तुमची संघटनाही देशद्रोही आहे. तुम्ही भारताचा सौदा केला आहे. तुम्ही आपल्या संस्था, आपले संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांवर हल्ले केले आहेत, अशी घणाघाती टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधींच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून राहुल गांधींना देशात अराजकता माजवायची आहे, असा आरोप केला आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, राहुल गांधींची भाषा एखाद्या शत्रू राष्ट्रासारखी आहे. भारताच्या आर्थिक ताकदीची जगाला कल्पना आहे, त्यासाठी राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही. देशातील जनता आणि तरुण पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, राहुल गांधींचे हे वक्तव्य लोकशाहीचा आणि १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे. त्यांची भाषा पाकिस्तान आणि पाकिस्तानातून चालणाऱ्या दहशतवाद्यांसारखी आहे. ते राजकीय विरोधक म्हणून नव्हे, तर भारतीय राजसत्तेविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तीसारखे वागत आहेत.
भाजप नेते नितीन नबीन म्हणाले, ज्यांनी देशातील दहशतवाद आणि नक्षलवाद समूळ नष्ट केला ते गद्दार की ज्यांनी दहशतवादाला आश्रय दिला ते गद्दार? देशातील जनता सर्व काही पाहत असून वेळ आल्यावर योग्य उत्तर देईल.
खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, अशी अपमानास्पद भाषा वापरणे हा काँग्रेसचा जुनाच पॅटर्न आहे. १९६५ चे युद्ध असो वा आणीबाणीचा काळ, आरएसएसने नेहमीच देशाला पुढे नेण्याचे काम केले आहे. ईव्हीएम, निवडणूक आयोग किंवा पंतप्रधान मोदींना शिव्या देणे आणि संघाचा अपमान करणे हा काँग्रेसचा रोजचा धंदा झाला आहे.
पंतप्रधान चॉकलेट वाटण्यात, रिल्स बनविण्यात व्यग्र
सध्या इटली दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सोशल मीडिया व्हिडिओचा (रील्स) संदर्भ देत राहुल गांधींनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. देशात आर्थिक संकट घोंगावत असताना, शेतकरी, तरुण, महिला आणि मजूर संकटात असताना आमचे पंतप्रधान इटलीत चॉकलेट वाटण्यात आणि रील्स बनवण्यात व्यग्र आहेत. हे नेतृत्व नसून एक नौटंकी आणि थट्टा आहे, असा टोला राहुल गांधींनी लगावला.

हेही वाचा