१.६६ कोटींचे दागिने चोरणाऱ्या सेल्सगर्लला अटक

फरार प्रियकराचा शोध सुरू : सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरीचा पर्दाफाश

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
20th May, 11:14 pm
१.६६ कोटींचे दागिने चोरणाऱ्या सेल्सगर्लला अटक

अहमदाबाद : शहरातील निकोल परिसरातील एका ज्वेलरी शोरूममधून तब्बल १.६६ कोटी रुपयांचे दागिने चोरी करून फरार झालेल्या सेल्सगर्लला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. हर्षिदा शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून, तिने तिचा प्रियकर मयूर माळी याच्यासोबत मिळून हा चोरीचा कट रचल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे.
११ मे रोजी हर्षिदाने शोरूममधील महागडे सोन्याचे दागिने चोरून पलायन केले होते. या घटनेनंतर दोघेही अहमदाबादमधून दिल्लीला गेले आणि त्यानंतर उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये लपून राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीनंतर दोघे एका हॉटेलमध्ये राहत होते. तीन दिवसांपूर्वी हर्षिदा आंघोळीसाठी गेली असताना तिचा प्रियकर मयूर माळी चोरलेले बहुतेक दागिने घेऊन पसार झाला. हर्षिदाकडे केवळ तिने अंगावर घातलेले काही दागिनेच उरले होते.
दरम्यान, पैशांची कमतरता भासू लागल्यानंतर हर्षिदा पुन्हा अहमदाबादला परतली. मंगळवारी संध्याकाळी ती उरलेले दागिने विकण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडून फरार प्रियकर मयूर माळीचा शोध सुरू आहे.
निकोल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनभाई शाह हे कृष्णानगर परिसरात वास्तव्यास असून निकोलमधील ग्रॅव्हिटी शॉपिंग मॉलमध्ये ‘आभूषण’ नावाचे सोन्या-चांदीचे शोरूम चालवतात. या शोरूममध्ये व्यवस्थापक, सेल्समन आणि मार्केटिंग कर्मचाऱ्यांसह एकूण १९ कर्मचारी कार्यरत आहेत.
हर्षिदा शेट्टीने सुमारे ११ महिन्यांपूर्वी सेल्सगर्ल म्हणून शोरूममध्ये नोकरी सुरू केली होती. ११ मे रोजी दुपारच्या सुमारास शोरूम मालक दर्शनभाई शाह जेवणासाठी घरी गेले होते. त्यावेळी शोरूममध्ये व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी उपस्थित असतानाच हर्षिदाने चोरी करून पळ काढला.
सायंकाळी पाचच्या सुमारास दर्शनभाई शोरूममध्ये परतल्यानंतर एका ग्राहकाला दागिने दाखवताना सोन्याचे एक नाणे गायब असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर हर्षिदाबाबत चौकशी करण्यात आली असता तिने मालकांची परवानगी घेऊन सुट्टीवर गेल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे समोर आले. मात्र, हे खोटे असल्याचे नंतर उघड झाले.
यानंतर शोरूममधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता हर्षिदा तिच्या ब्लेझरमध्ये दागिने लपवत असल्याचे स्पष्ट दिसून आले. तिने जवळ बसलेल्या कर्मचाऱ्याशी सहज संवाद साधत चोरी केल्याचेही फुटेजमध्ये आढळले.
दर्शनभाई शाह यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. हर्षिदाचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर शोरूममधील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करण्यात आली असता सोन्याच्या चेन, लॉकेट, झुमके, मंगळसूत्रे आणि विविध अंगठ्यांसह एकूण १.६६ कोटी रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा अधिक तपास निकोल पोलिसांकडून सुरू असून फरार आरोपी मयूर माळीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा