ट्रॉफी, जर्सी अनावरणाने क्रिकेट महोत्सवाची शानदार सुरुवात

पणजी : पर्वरी मतदारसंघात क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचणार असून बहुप्रतिक्षित आमदार चषक पुरूष आणि महिला संघ क्रिकेट स्पर्धेला २१ मे पासून सुरूवात होत आहे. ही स्पर्धा पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन अशोक खंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून ती २४ मे पर्यंत चालेल.
या प्रतिष्ठित स्पर्धेत मतदारसंघातील विविध भागांतील ७०हून अधिक संघांचा सहभाग असणार असून त्यात सुमारे ६१ पुरूष व १० महिला संघ आहेत. युवा क्रिकेटपटू व क्रीडाप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा पर्वरी रायझिंगचा उपक्रम आहे. पर्वरीत क्रिकेटचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असून उद्यापासून संपूर्ण मतदारसंघात क्रिकेटचे वातावरण निर्माण होणार आहे.
स्पर्धेच्या भव्य प्रारंभाचा एक भाग म्हणून बुधवारी सायंकाळी आर्ट पार्क येथे ट्रॉफी व विविध संघासाठी जर्सी अनावरण सोहळा झाला. या सोहळ्यास पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर, अमित अस्नोडकर, सरपंच स्वप्नील चोडणकर, सोनिया पेडणेकर, पर्वरी भाजप मंडळ अध्यक्ष विनीत परब, पंच सदस्य तसेच मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या सोहळ्यात सहभागी संघांच्या जर्सीचे अधिकृत अनावरण करण्यात आले. यामुळे पर्वरीतील रोमांचक आणि स्पर्धात्मक क्रिकेट हंगामाची अधिकृत सुरुवात झाली आहे. स्पर्धा आयोजकांनी सर्व कर्णधार, खेळाडू, समर्थक आणि पर्वरीकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेला भव्य यश मिळवून देण्याचे आवाहन केले आहे. आमदार चषक, ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रीडाभावना, एकता आणि युवा प्रतिभेचा उत्सव आहे. खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमधील उत्साह पर्वरीतील वाढत्या क्रीडा संस्कृतीचे प्रतीक आहे, असे खंवटे यांनी जर्सी अनावरणानंतर सांगितले.
२४ रोजी अंतिम सामना
ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करणार असून गुरुवारपासून संपूर्ण मतदारसंघात उत्साही क्रीडा वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे. २१ ते २४ मे पर्यंत चालणार्या या स्पर्धेचे अंतिम सामने २४ मे रोजी होतील.