'आप'तर्फे पाच नव्या विभागप्रमुखांची नियुक्ती

पक्ष संघटन करणार मजबूत : वाल्मिकी नाईक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
'आप'तर्फे पाच नव्या विभागप्रमुखांची नियुक्ती

पणजी : राज्यात आम आदमी पक्षाचे (आप) संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाने पाच नव्या विभागप्रमुखांची नियुक्ती केली आहे. यानुसार महिला विभागाच्या अध्यक्षपदी ममता मेबन यांची निवड करण्यात आली आहे. तर ओबीसी विभागप्रमुख म्हणून संदीप पेडणेकर, एसटी विभागप्रमुख म्हणून राजेश गावकर, अल्पसंख्याक विभागप्रमुख म्हणून जेम्स फर्नांडिस आणि युवा विभागप्रमुख म्हणून पूजन मालवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

नाईक यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांपासून पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार काही बदल करण्यात येणार होते; मात्र महानगरपालिका आणि फोंडा पोटनिवडणुकीमुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागला. नवनियुक्त अध्यक्षांवर जिल्हा, मतदारसंघ तसेच बूथ पातळीवर पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापुढील काळात पक्षाचे काम अधिक जोमाने केले जाईल. एसटी आणि ओबीसी समाज एकत्र आल्यास भाजपला मोठा राजकीय फटका बसणार आहे. हाच विचार करून भाजप या दोन्ही समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात ओबीसी आणि एसटी समाजाचे मतदान लक्षणीय आहे. असे असले तरी भाजपला या समाजाची आठवण केवळ निवडणुकीपुरतीच येते. समाजात एकी झाली तर त्याचा तोटा होणार असल्याने, हे समाज एकत्र येऊ नयेत यासाठी भाजप सातत्याने षड्यंत्र रचत आहे. भाजपमधील एसटी नेत्यांनी मागील साडेचार वर्षे केवळ एकमेकांशी भांडणे केली आणि आता निवडणूक जवळ आल्याने आपण एकत्र आहोत, असा देखावा ते करत आहेत. भाजपचे हे राजकारण गोमंतकीय जनतेला चांगलेच समजले असून, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे.

राजेश गावकर (एसटी विभागप्रमुख): राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या सुमारे २२ ते २३ टक्के आहे. समाजाला २००३ मध्ये एसटीचा दर्जा मिळाला असला, तरी अद्याप त्यांच्या प्रमुख मागण्या प्रलंबितच आहेत. मागील अनेक वर्षे सरकार या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आम्ही राज्यातील एसटी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे लढणार आहोत.

युवकांचा 'कॉकरोच जनता पार्टी'ला पाठिंबा: पूजन मालवणकर

भाजप सरकारच्या कार्यकाळात युवा वर्गाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. देशात आणि राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली असून, शिक्षण क्षेत्रातही मोठे घोटाळे सुरू आहेत. तरुणांचे प्रश्न सोडवण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळेच, आजच्या तरुण पिढीचा (जेन झी) 'कॉकरोच जनता पार्टी'ला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.

हेही वाचा