मुंबईतील तरुण जोडप्यास अटक

मुंबई : आपल्या ड्रग्जचे व्यसन पूर्ण करण्यासाठी आणि लग्नानंतर ‘नवीन आयुष्य’ सुरू करण्याच्या बहाण्याने एका १९ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या मदतीने सख्ख्या आजीच्याच घरात लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. कांदिवली पश्चिम येथील चारकोप पोलिसांनी या तरुण जोडप्याला अटक केली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारकोप परिसरातील एका ६५ वर्षीय महिलेने ४ मे रोजी पुण्यात आपल्या मूळ गावी जाण्यापूर्वी घरातील सोन्याचे दागिने कपाटातील लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले होते. १४ मे रोजी हे कुटुंब मुंबईत परतले असता, त्यांना कपाटाचे लॉकर तुटलेल्या अवस्थेत आणि दागिने गायब असल्याचे आढळले.
घरात वारंवार ये-जा असल्यामुळे कुटुंबीयांचा सुरुवातीपासूनच नातीवर संशय होता. कसून विचारपूस केली असता तिने प्रियकराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. सुरुवातीला तिने दागिने परत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे कुटुंबाने पोलिसांत जाणे टाळले. मात्र, दागिने परत करण्याऐवजी १७ मे रोजी पहाटे ही तरुणी प्रियकरासोबत घर सोडून पळून गेली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिस तपासात या चोरीमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. तरुणीच्या प्रियकराला ड्रग्जचे तीव्र व्यसन असून, त्यासाठी लागणारे पैसे उभे करणे हा या चोरीचा मुख्य उद्देश होता. तसेच, या दागिन्यांच्या पैशांतून लग्न करून मुंबईबाहेर नवीन संसार थाटण्याचा या दोघांचा प्लॅन होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून चारकोप पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत १८ मे रोजी दोघांनाही बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.