पंतप्रधानांना ‘झालमुडी’ खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला जीवे मारण्याच्या धमक्या

बिक्रम साव यांचे कुटुंबीय मानसिक तणावाखाली

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd May, 06:53 pm
पंतप्रधानांना ‘झालमुडी’ खाऊ घालणाऱ्या दुकानदाराला जीवे मारण्याच्या धमक्या

कोलकाता : पश्चिम बंगालमधील झाडग्राम येथे रस्ता कडेला ‘झालमुडी’ (एक प्रकारची भेळ) विकणारे व्यावसायिक बिक्रम साव यांना जीवे मारण्याच्या आणि दुकान बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिक्रम यांच्या दुकानात थांबून झालमुडी खाल्ली होती, ज्यानंतर बिक्रम साव देशभरात चर्चेत आले होते.
बिक्रम साव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून धमक्यांचे फोन येत आहेत. फोन करणारे लोक अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करत असून तुझे दुकान बॉम्बने उडवून टाकू, अशी धमकी देत आहेत. इतकेच नव्हे तर, एका व्हिडिओ कॉल दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना थेट घातक शस्त्रेही दाखवली. या सततच्या धमक्यांमुळे बिक्रम साव आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. या संवेदनशील प्रकरणावर अद्याप स्थानिक पोलिसांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिल रोजी निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालच्या झाडग्राम येथे एका जाहीर सभेला संबोधित केले होते. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधानांनी आपला ताफा थांबवून बिक्रम साव यांच्या दुकानातून झालमुडी विकत घेऊन खाल्ली होती. पंतप्रधानांनी या भेटीचा सुमारे ४० सेकंदांचा एक व्हिडिओ आणि काही छायाचित्रे आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान तिथे उपस्थित लहान मुलांनाही झालमुडी खाऊ घालताना आणि बिक्रम यांच्याशी हलक्या-फुलक्या गप्पा मारताना दिसले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
पंतप्रधानांचा १० मिनिटे संवाद
बिक्रम साव हे मूळचे बिहारचे रहिवासी असून, सध्या आपल्या आई-वडिलांसह बंगालमध्ये स्थायिक आहेत. पंतप्रधानांच्या भेटीचे आठवणी सांगताना बिक्रम म्हणाले होते, पंतप्रधान मोदी माझ्या दुकानात येतील, असा मी कधी विचारही केला नव्हता. मी त्यांच्यासाठी खास झालमुडी बनवली. मी पैसे घेण्यास नकार दिला, तरीही त्यांनी आग्रहाने पैसे दिले आणि झालमुडी खूप छान झाल्याची पावतीही दिली. ते पुढे म्हणाले, पंतप्रधानांनी माझ्या शिक्षणाविषयी विचारले असता, गरिबीमुळे मी जास्त शिकू शकलो नाही, असे मी सांगितले. तसेच रोजची कमाई १००० ते १२८० रुपये असल्याचे त्यांना सांगितले. पंतप्रधान सुमारे १० मिनिटे माझ्या दुकानात थांबले होते, मात्र त्यांनी राजकारणाविषयी एकही शब्द काढला नाही.

हेही वाचा