धक्कादायक! 'मास्टर की' वापरून पर्यटकांच्या खोलीत घुसण्याचा हॉटेल कर्मचाऱ्याचा प्रयत्न

दक्षिण गोव्यातील कोलवा येथील घटना; सोशल मिडियावर व्हिडिओ जारी करून पर्यटक महिलेने दिली माहिती.

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
6 hours ago
धक्कादायक! 'मास्टर की' वापरून पर्यटकांच्या खोलीत घुसण्याचा हॉटेल कर्मचाऱ्याचा प्रयत्न

मडगाव : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात पर्यटकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण गोव्यातील कोलवा येथील नामांकित 'गोल्डन क्राउन' हॉटेलमध्ये एका ठाणे-मुंबई येथील प्राजक्ता चिटणीस यांच्या    कुटुंबासोबत अत्यंत संतापजनक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला. 



हॉटेलच्या रूममध्ये पर्यटक कुटुंब गाढ झोपेत असताना, हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने कोणतीही पूर्वपरवानगी किंवा माहिती न देता थेट 'मास्टर की' (डुप्लिकेट चावी) वापरून रात्री ११ वाजता खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने पर्यटकांना तात्काळ जाग आली आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले.

या गंभीर प्रकारानंतर संतापलेल्या पर्यटकांनी हॉटेल व्यवस्थापनाला धारेवर धरले असता, व्यवस्थापनाकडून अत्यंत उडवाउडवीची आणि संशयास्पद उत्तरे देण्यात आली. सुरुवातीला हॉटेल स्टाफने खोलीचा एसी खराब झाल्याचे समजल्यामुळे आलो असे सांगितले, तर नंतर तुम्ही एक्स्ट्रा डबल बेड मागितला होता म्हणून आलो अशी खोटी कारणे पुढे केली. पर्यटकांनी आपण अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले. जर वेळेवर जाग आली नसती तर बरेवाईट घडले असते, अशी भीती व्यक्त केली आहे. याप्रकरणी पर्यटकांनी कोळवा पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई सुरू आहे. 

हेही वाचा