दोन आठवड्यात चार वेळा वाढले पेट्रोल-डिझेल

पणजी : पेट्रोलचे दर २.६१ तर डिझेलचे दर २.७१ रुपयांनी वाढल्याने इतर राज्यांसहीत गोव्यात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले. दरवाढीनंतर गोव्यात पेट्रोल १०३.९१ रुपये तर डिझेल ९५.८० रुपये लिटर झाले आहे. (Petrol-diesel in Goa) स्पीड पेट्रोलचे दर ११३.५२ रुपये एवढे आहेत. पेट्रोल डिझेलचा दर वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचा दर वाढण्याची भीती आहे. डिझेलचे दर वाढल्याने तिकीट दर वाढवण्याची मागणी बस मालक करू लागले आहेत.
सर्वात प्रथम १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर ३ रुपयांनी वाढले. या दरवाढीनंतर गोव्यात पेट्रोलचे दर ९९.५० रुपये तर डिझेलचे दर ९१.२५ रुपये एवढा झाला. त्यानंतर १९ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर ९० पैशांनी वाढले.
त्यानंतर २३ मे रोजी पेट्रोलचे दर ८७ पैसे तर डिझेलचे दर ९१ पैसे एवढे वाढले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असताना आज सोमवारी पेट्रोलचे दर २.६१ रुपये तर डिझेलचे दर २.७१ रुपये एवढे वाढले. सर्व दरवाढीची बेरीज केल्यास पेट्रोल, डिझेल ७.५ रुपये एवढे वाढले.
इतर राज्यांपेक्षा गोव्यात दर कमी
दरवाढ होऊनही इतर राज्यांपेक्षा गोव्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी आहे. मुंबईत पेट्रोल १११.२० रुपये तर डिझेल ९७.८० रुपये लिटर आहे. बंगळुरूत पेट्रोल ११०.६० रुपये तर डिझेल ९८.५० रुपये एवढे आहे.