तेल विपणन कंपन्यांची आकडेवारी

पणजीः गोव्यात (Goa) इंधनाच्या विक्रीत बरीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी १ ते २४ मे दरम्यान पेट्रोलच्या विक्रीत ७.६२ टक्के आणि डिझेलच्या विक्रीत १०.७ टक्के वाढ झाली. या पार्श्वभूमीवर सरकारी तेल विपणन कंपन्यांनी ग्राहकांना आश्वासन दिले की, इंधनाची कमतरता नाही आणि पूर्ण देशात पुरवठा सुरळीत सुरू आहे.
तेल विपणन कंपनींचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र पांडे यांनी सांगितले की, इंडियन ऑईल (Indian oil), भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदूस्तान पेट्रोलियम (Hindusthan Petroleum) ग्राहकांसाठी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी लॉजिस्टिक्स सांभाळत आहोत.
पांडे यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात गेल्या वर्षी याच काळात तुलनेत १ ते २४ मे या काळात इंधनाच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत ७.६२ टक्के वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किरकोळ विक्रीत १०.०७ टक्के वाढ झाली आहे.
पांडे यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्राकडे तसेच पूर्ण देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची आवश्यक तेवढा साठा आहे आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी आणि इंधन पुरवठ्यात कसलाच अडथळा येऊ नये म्हणून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
तसेच नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन विकत घ्यावे व घाबरून जास्त इंधन विकत घेऊ नये. गरज नसताना साठवणूक केल्यास पुरवठा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. पुरवठा व्यवस्था स्थिर आहे आणि सध्याच्या मागणीची गरज भागवण्यासाठी सक्षम आहे, असे पांडे यांनी सांगितले.