लग्नात दिले अनोखे 'रिटर्न गिफ्ट'; संपूर्ण गावाला ३३ कोटींचा विमा !

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
8 hours ago
लग्नात दिले अनोखे 'रिटर्न गिफ्ट'; संपूर्ण गावाला ३३ कोटींचा विमा !

नांदेड : आजकालची लग्ने म्हटली की डोळे दिपवणारी रोषणाई, महागडे कपडे आणि पैशांची उधळपट्टी हे जणू समीकरणच बनले आहे. मात्र, नांदेड जिल्ह्यातील बहादरपुरा गावच्या एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नात संपूर्ण गावालाच सुरक्षेचे अनोखे 'रिटर्न गिफ्ट' दिले आहे. लग्नाचे औचित्य साधत या कुटुंबाने गावातील प्रत्येक नागरिकाचा अपघात विमा उतरवला असून, यामुळे तब्बल ३,४६५ गावकऱ्यांना १ लाख रुपयांचे सुरक्षा कवच मिळाले आहे.

बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांचा विवाह २० मे रोजी संपन्न झाला. हा आनंदाचा क्षण केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता गावकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरावा, असा विचार सिद्धेश्वर आणि त्यांचे मोठे बंधू अनुप पेठकर यांनी केला. ग्रामीण भागात सर्पदंश, वीज पडणे किंवा शेतीकामातील अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. अशा वेळी गरीब कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हीच गरज ओळखून पेठकर कुटुंबाने गावकऱ्यांना विमा कवच देण्याचा निर्णय घेतला.

हा उपक्रम पद्धतशीरपणे पूर्ण करण्यासाठी पेठकर कुटुंबाने ग्रामपंचायतीच्या नावावर एक सामूहिक अपघात विमा पॉलिसी खरेदी केली. यासाठी गावातील मतदार यादीचा वापर करण्यात आला, ज्यामुळे कोणताही पात्र नागरिक या योजनेतून सुटला नाही. या अंतर्गत संपूर्ण गावाची मिळून एकूण ३३.६ कोटी रुपयांची विमा रक्कम सुरक्षित करण्यात आली आहे. ही पॉलिसी पुढील एका वर्षासाठी लागू राहणार आहे.

आम्हाला प्रसिद्धी नको, तर फक्त लोकांचे आशीर्वाद हवे आहेत," अशी भावना नवविवाहित सिद्धेश्वर पेठकर यांनी व्यक्त केली. लग्नाला ४,५०० हून अधिक पाहुणे उपस्थित होते, मात्र या विम्याच्या घोषणेने सोहळ्याची शोभा अधिकच वाढवली. गावाचे सरपंच बळीराम पेठकर यांनी, "एका लग्नात संपूर्ण गावाला विमा मिळण्याची ही पहिलीच अभूतपूर्व घटना असावी," अशा शब्दांत कुटुंबाचे आभार मानले. सोशल मीडियावरही या अनोख्या 'रिटर्न गिफ्ट'चे मोठे कौतुक होत आहे.

हेही वाचा