चुकीचीच उत्तरपत्रिका पाठवली, अखेर चूक मान्य.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) यंदाच्या डिजिटल मूल्यमापन प्रणालीतील एका मोठ्या गोंधळामुळे दिल्लीतील एका विद्यार्थ्याला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. १२ वीच्या भौतिकशास्त्र विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने पडताळणीसाठी अर्ज केलेल्या वेदांत श्रीवास्तव या विद्यार्थ्याला बोर्डाने दुसऱ्याचीच उत्तरपत्रिका पाठवली. हा प्रकार वेदांतने सोशल मीडियावर उघडकीस आणल्यानंतर त्याला थेट 'देशद्रोही' आणि 'पाकिस्तानी' म्हणत प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र, अखेर सीबीएसईने आपली चूक कबूल करत वेदांतला त्याची खरी उत्तरपत्रिका पाठवली असून त्याचे गुण सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.

नेमका काय होता प्रकार?
१३ मे रोजी सीबीएसईचा १२ वीचा निकाल जाहीर झाला. त्यात वेदांतला भौतिकशास्त्रात अत्यंत कमी गुण मिळाले. त्यामुळे त्याने १९ मे रोजी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज केला. २३ मे रोजी जेव्हा त्याला प्रत मिळाली, तेव्हा त्यावरील हस्ताक्षर त्याचे नव्हते. वेदांतने लगेचच आपल्या इंग्रजी आणि कॉम्प्युटर सायन्सच्या उत्तरपत्रिकांसोबत या भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकेचे फोटो 'एक्स' (ट्विटर) वर शेअर करत, "ही माझी उत्तरपत्रिका नाही," असे स्पष्ट केले.
वेदांतचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आणि त्याला ३२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. मात्र, काही युजर्सनी त्याच्या नवीन अकाऊंटवरील लोकेशन 'साऊथ आशिया' असल्याचे पाहून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्याला 'पाकिस्तानी' आणि 'अँटी-नॅशनल' संबोधले.
वेदांतचे वडील संजय श्रीवास्तव यांनी सांगितले की, "या ट्रोलिंगमुळे माझ्या मुलाच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला, तो रात्रभर झोपू शकला नाही." वेदांतचा भाऊ सिद्धार्थ याने स्पष्ट केले की, ट्विटर अकाऊंट तयार करताना तांत्रिक समस्येमुळे ते लोकेशन दिसत होते.
सीबीएसईकडून चूक मान्य
चौफेर टीका झाल्यानंतर सीबीएसईच्या संयुक्त सचिवांशी (जॉइंट सेक्रेटरी) संपर्क साधून वेदांतची माफी मागितली. बोर्डाने अधिकृतपणे स्पष्ट केले की, 'ऑन-स्क्रीन मार्किंग' सिस्टीममधील तांत्रिक त्रुटीमुळे वेदांतच्या रोल नंबरवर दुसरी उत्तरपत्रिका अपलोड झाली होती. बोर्डाने त्याची खरी उत्तरपत्रिका ईमेलवर पाठवली असून २९ मे पर्यंत त्याचे गुण अपडेट केले जातील.
या डिजिटल गोंधळानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले की, सीबीएसईच्या या डिजिटल प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. सत्य समोर आल्यानंतर वेदांतच्या भावाने सोशल मीडियावर त्यांच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत समर्थकांचे आभार मानले.