सामूहिक बलात्काराचा आरोप रद्द

जयपूर : अल्पवयीन मुलीवरील लैंगीक अत्याचार प्रकरणात आसाराम बापू (Asaram Bapu) यांना सुनावण्यात आलेली जन्मठेप राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajsthan High Court) बुधवारी कायम ठेवली. २०१८ मध्ये विशेष पोक्सो (POCSO) न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात दाखल केलेली आसाराम बापू यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
तथापी, न्यायालयाने आसाराम यांना अंशत: दिलासा देत सामूहिक बलात्कार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप रद्द केले. जोधपूर खंडपीठातील न्यायमूर्ती अरुण कुमार मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला.
न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय दंड संहितेअंतर्गत बलात्कार, पोक्सो कायद्यानुसार लैंगिक अत्याचार तसेच बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हे सिद्ध झाले आहेत. मात्र, सामूहिक बलात्कार आणि कट रचल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे अपुरे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या प्रकरणातील सहआरोपी शरदचंद्र आणि शिल्पी यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली. यापूर्वी विशेष न्यायालयाने त्यांना २० वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.
हे प्रकरण २०१३ मधील असून, जोधपूर येथील आश्रमात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आसाराम बापू यांच्यावर करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. आणि एप्रिल २०१८ मध्ये विशेष पोक्सो न्यायालयाने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
सध्या वैद्यकीय कारणांमुळे आसाराम बापू अंतरिम जामीनावर बाहेर आहेत. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. सहआरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागण्याची तयारी पीडित पक्षाने दर्शवली आहे.