'सामूहिक विवाह' सोहळ्याच्या नावाखाली ४२ वरांची फसवणूक

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
7 hours ago
'सामूहिक विवाह' सोहळ्याच्या नावाखाली ४२ वरांची फसवणूक

मध्य प्रदेश : येथील प्रसिद्ध माता टेकरी मंदिरात लग्नाच्या आशेने गळ्यात फुलांचे हार घालून वऱ्हाडासह पोहोचलेल्या तब्बल ४२ वरांची वधूविनाच फसवणूक झाली. याप्रकरणी देवास पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली असून, एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आंतरराज्यीय फसवणूक करणारी टोळी अत्यंत पद्धतशीरपणे जाळे चालवत होती. लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या गरजू तरुणांशी मध्यस्थांमार्फत संपर्क साधला जायचा. इंदूरमधील एका अनाथाश्रमातील मुली लग्नासाठी तयार असल्याचे सांगून तरुणांना जाळ्यात ओढले जात होते. विश्वास संपादन करण्यासाठी तरुणांना सोशल मीडियावरून चोरलेले मुलींचे फोटो मोबाईलवर पाठवले जायचे. इतकेच नव्हे तर, "या सामूहिक विवाहाला स्वतः मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, वधूला शासनाकडून ५१ हजार रुपयांचा धनादेश (चेक) दिला जाईल," असे खोटे आमिषही दाखवण्यात आले होते.

फसवणुकीच्या या जाळ्यात भोपाळसह १५० किलोमीटर दूरवरून आलेले तरुण अडकले होते. यामध्ये २० वर्षांच्या तरुणांपासून ते ६० वर्षांच्या वृद्धांचाही समावेश होता. नोंदणीच्या नावाखाली आयोजकांनी प्रत्येकाकडून १२ ते २५ हजार रुपये उकळले होते. लग्नाचे कपडे आणि हळद-मेहंदीचे विधी देवासमध्येच केले जातील, त्यामुळे घरून साध्या कपड्यांत यावे, असे निक्षून सांगण्यात आल्याने अनेकांनी घरचे विधीही केले नव्हते. सकाळी ८ वाजता वऱ्हाडी मंदिरात पोहोचले. आयोजक मुकेश बैरागी आणि त्याची पत्नी सुनीता यांनी "मुली गाड्यांमधून इंदूरहून निघाल्या आहेत," असे सांगत कुटुंबीयांना रात्रभर ताटकळत ठेवले. अखेर मध्यरात्री १२ वाजल्यानंतरही कोणी न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वऱ्हाड्यांनी गोंधळ घातला.

या संदर्भात देवासचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, पीडितांच्या तक्रारीवरून मुकेश बैरागी, सुनीता बैरागी, दिनेश बैरागी आणि अन्य एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेशसह दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार दिनेश बैरागीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे समाजात मोठी बदनामी झाली असून, भविष्यात लग्न जमण्यात अडचणी येतील या भीतीने अनेक पीडित तरुण धास्तावले आहेत. मात्र, कायदेशीर लढाई लढून आरोपींना शिक्षा देण्याचा निर्धार पीडितांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा