
म्हापसा : दत्तवाडी येथील कामत गार्डन कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून फर्नांडिस दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील काही साहित्याचे नुकसान झाले. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आत असलेले सिलिंडर प्रथम बाहेर काढले. नंतर शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. जखमी फर्नांडिस दाम्पत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून; अधिक तपास सुरू आहे.