पूर्ववैमनस्यातून अल्पवयीनाला मारहाण, चारजणांना अटक

फातोर्डा पोलिसांची कारवाई; एक पसार : मुंगूल गँगवॉरमधील संशयितांचा समावेश

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
पूर्ववैमनस्यातून अल्पवयीनाला मारहाण, चारजणांना अटक

मडगाव : मडगाव येथील कदंब बसस्थानकानजीक एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून; चारजणांना अटक केली आहे.

 या मारहाणप्रकरणी शादाफ बुडेल मुल्ला (१९ वर्षे, रा. घोगळ हाउसिंग बोर्ड) यांनी फातोर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराचा १७ वर्षीय भाऊ मडगावच्या कदंब बसस्थानक परिसरात असताना, संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्याला गाठले. यावेळी प्रकाश रमणा वेल्मा (रा. नेसाय), श्लोक संजय शिंदे (२२ वर्षे रा. नावेली), मैफुज अस्लम सय्यद (२१ वर्षे, रा. नावेली), सुनील बिलावर (२० वर्षे, रा. घोगळ, हाउसिंग बोर्ड) आणि अक्षय पुंडलिक तलवार (रा. बोर्डा) यांनी संगनमताने पीडित मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मुलाला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी 

या मारहाणीत पीडित मुलगा किरकोळ जखमी झाला.  संशयितांनी मारहाण केल्यानंतर मुलाला गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. फातोर्डा पोलिसांनी या पाचही संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता व गोवा बाल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. यातील संशयित प्रकाश वेल्मा, श्लोक शिंदे, मैफुज सय्यद, सुनील बिलावर यांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली आहे. तर संशयित अक्षय तलवार याचा शोध घेण्यात येत आहे. फातोर्डा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मुंगूल गँगवॉरमधील संशयितांचा समावेश

कदंब बसस्थानकाकडील हा मारहाणीचा प्रकार जुन्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. याशिवाय मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी प्रकाश वेल्मा व सुनील बिलावर तसेच पसार असलेला अक्षय तलवार यांचा समावेश यापूर्वी फातोर्डा मुंगूल येथे ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये होता. त्या प्रकरणात सध्या हे संशयित जामिनावर तुरुंगाबाहेर असताना पुन्हा त्यांनी गुन्हा केला आहे.

हेही वाचा