मडगावात पार्क केलेल्या रेल्वे डब्याला आग; घातपाताचा संशय

अग्निशामक दलाकडून आगीवर वेळेत नियंत्रण; जीवितहानी टळली

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
मडगावात पार्क केलेल्या रेल्वे डब्याला आग; घातपाताचा संशय
Pic By: संतोष मोरजकर

मडगाव : मडगाव रेल्वे स्थानकानजीक उभ्या करण्यात आलेल्या मडगाव-पनवेल विशेष गाडीच्या एका डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत रेल्वेचा एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने, दुर्घटना घडली तेव्हा गाडीत कोणीही प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मडगाव अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.



मडगाव रेल्वे स्थानकावर उभ्या केलेल्या रेल्वे गाडीच्या डब्याला आग लागल्याची ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. ही एक विशेष ट्रेन असून ती शनिवारी मडगाव जंक्शनवरून पनवेलच्या दिशेने रवाना होणार होती. आगीची माहिती मिळताच स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने उपलब्ध असलेल्या १४ अग्निशमन सिलिंडरचा (Fire Extinguisher) वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही.




त्यानंतर घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेगाडीवर पाण्याचा मारा करण्यापूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे मार्गावरील २५ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी बंद करण्यात आली. तसेच, इंजिनच्या लगतच्या डब्याला आग लागल्यामुळे इतर डब्यांपर्यंत आग पसरू नये, यासाठी तो डबा तातडीने वेगळा करण्यात आला. अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसून ती कोणीतरी मुद्दामहून लावली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी कोकण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलातर्फे (RPF) केली जात आहे.




कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष गाडीच्या डब्याला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी २:५० वाजण्याच्या सुमारास घडली. ही गाडी बाजूला उभी असल्यामुळे आणि त्यात कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे. आग लावण्यात आल्याचा संशय असून चौकशी समितीच्या पाहणीनंतरच अपघाताचे खरे कारण आणि झालेल्या नेमक्या नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.



अग्निशामक दलाला स्थानक परिसरात येण्यास अडचणी

मडगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वेगाडीच्या डब्याला आग लागल्याची वर्दी मडगाव अग्निशामक दलाला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिळाली. मात्र, अग्निशामक दलाची गाडी थेट रेल्वे स्थानकाच्या ट्रॅक परिसरापर्यंत नेण्यासाठी कोणताही अंतर्गत मार्ग उपलब्ध नसल्याने सुरुवातीला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अखेर, ईएसआय (ESI) इस्पितळासमोरील दोन इमारतींच्या मधल्या मोकळ्या जागेत अग्निशामक बंब उभे करण्यात आले. तिथून पाण्याचे लांब पाईप्स रेल्वे स्थानकाच्या परिसरात ओढून घेत जवानांनी पाण्याचा मारा केला आणि आग आटोक्यात आणली, अशी माहिती मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल सुझा यांनी दिली.



कुणीतरी मुद्दामहून आग लावल्याचा संशय 

सदर रेल्वेगाडी रेल्वे स्थानकाच्या आऊटर परिसरातील ट्रॅकवर उभी करण्यात आलेली होती. प्राथमिक तपासणीनुसार, या डब्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शॉर्ट सर्किट होण्याची तांत्रिक शक्यता नाही. त्यामुळे ही आग बाहेरील घटकांकडून लावण्यात आली असण्याची शक्यता दाट आहे. चौकशीनंतरच या घातपातामागील खरे कारण समोर येईल, असे रेल्वे उपप्रबंधक तथा वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा