'लिटआरपीजी' जॉनर हिट; लेखकांची महिन्याला लाखो रुपयांची कमाई. व्हिडिओ गेम आणि साहित्याचा मिलाफ असलेल्या 'गेमीफाइड नॉवेल्स'ची जगभर जोरदार चर्चा.

पणजी : डिजिटल युग अवतरल्यापासून बदलत्या आवडीनिवडींमुळे वाचन संस्कृतीतही एक मोठा आणि रंजक बदल पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक पातळीवर आणि विशेषतः तरुणाईमध्ये 'गेमीफाइड नॉवेल्स' म्हणजेच 'लिटआरपीजी' (लिटरेरी रोल-प्लेइंग गेम्स) या साहित्य प्रकाराचा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे.

ही पुस्तके वाचताना वाचकाला केवळ एक कथा वाचल्याचा अनुभव येत नाही, तर तो स्वतः एखादा व्हिडिओ गेम खेळत असल्याचा किंवा पाहत असल्याचा प्रत्यक्ष आभास निर्माण होतो. रोजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जगण्यातून काही काळ सुटका करून घेण्यासाठी आणि निखळ मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी वाचक या नव्या विधेकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. यामध्ये महिला आणि ३० ते ४० वयोगटातील नोकरदार वर्गाचा समावेश सर्वाधिक आहे, जे बालपणीच्या व्हिडिओ गेमच्या आठवणींना या माध्यमातून उजाळा देत नोस्टेल्जियाचा अनुभव घेत आहेत.
'गेमीफाइड नॉवेल्स'चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लेखनशैली पारंपारिक लेखनापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. जुन्या कादंबऱ्यांमध्ये एखाद्या पात्राची ताकद, त्याचे गुणवैशिष्ट्ये किंवा प्रगती दाखवण्यासाठी लेखकांना पानापानांचे दीर्घ परिच्छेद लिहावे लागत असत. मात्र, या नव्या रचनेत लेखक केवळ 'लेव्हल अप' (Level Up) अशी एकच ओळ लिहितात आणि वाचकही डिजिटल भाषेशी परिचित असल्याने पात्राची शक्ती वाढल्याचे लगेच समजून घेतात. या कथांमध्ये मुख्य पात्राचे उरलेले आयुष्य (Life Points), त्याच्याकडे असलेल्या जादुई किंवा तांत्रिक शक्ती आणि त्याने पार केलेले टप्पे यांची सांख्यिकीय माहिती सोबत दिली जाते.
![]()
सध्या या पुस्तकांचा वापर केवळ छापील स्वरूपात न होता, 'ऑडिओबुक'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. प्रवास करताना किंवा फावल्या वेळेत इयरफोन लावून या रोमांचक कथा ऐकण्याला तरुण वर्ग सर्वाधिक पसंती देत आहे. मॅट डिनिमैन लिखित 'डंजन क्रॉलर कार्ल' हे या प्रकारातील एक अत्यंत लोकप्रिय उदाहरण असून, या पुस्तकाच्या आतापर्यंत २७ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि त्यावर आधारित वेब सीरिजची निर्मितीही सुरू आहे.

या नव्या प्रवाहाने केवळ वाचकांनाच आकर्षित केले नसून नवोदित लेखकांसाठीही उत्पन्नाचे आणि लोकप्रियतेचे मोठे दरवाजे खुले केले आहेत. पारंपारिक पब्लिशिंग हाऊसच्या चक्रात न अडकता हे लेखक इंटरनेटच्या माध्यमातून थेट वाचकांशी जोडले जात आहेत. अनेक लेखक दररोज कथेचे एकेक प्रकरण ऑनलाईन पोस्ट करतात आणि वाचकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया व सूचनांचा आधार घेऊन कथेचा पुढचा प्रवास निश्चित करतात.

या व्यावसायिक मॉडेलमुळे लेखकांची आर्थिक स्थिती कमालीची बदलली असून, 'जोगार्थ' सारखे आघाडीचे लेखक इंटरनेटवरील या गेमीफाइड साहित्याच्या बळावर महिन्याला सुमारे ७५ लाख रुपयांची घसघशीत कमाई करत आहेत.