भररस्त्यात फोनवर बोलताना मागून ५.५० लाखांची चोरी

अहमदाबादमधील प्रकार सीसीटीव्हीत कैद

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
7 hours ago
भररस्त्यात फोनवर बोलताना मागून ५.५० लाखांची चोरी

अहमदाबाद : स्मार्टफोनच्या वाढत्या व्यसनामुळे लोकांचे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असून, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार आणि चोरटे घेत आहेत. अशीच एक डोळे उघडवणारी आणि अवाक् करणारी घटना अहमदाबाद परिसरातून समोर आली आहे. एका तरुणाला भररस्त्यात मोबाईल फोन वापरणे इतके महागात पडले की, चोराने त्याच्या पाठीवरील बॅगेतून तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड काढले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओतील दृश्यांनुसार, एक तरुण पाठीवर बॅग अडकवून रस्त्यावरून पायी चालला होता. मात्र, त्याचे संपूर्ण लक्ष हातात असलेल्या मोबाईल स्क्रीनवर होते. तो आपल्याच धुंदीत फोन चालवत पुढे जात असताना, मागून येणाऱ्या एका सराईत चोराने गर्दीचा आणि त्याच्या दुर्लक्षाचा फायदा घेतला. चोराने अत्यंत शिताफीने तरुणाच्या नकळत त्याच्या पाठीवरील बॅगेची चेन उघडली आणि त्यातील पैशांचे बंडल काढून पोबारा केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भररस्त्यात हा सर्व प्रकार घडत असताना आजूबाजूच्या एकाही नागरिकाच्या ही बाब लक्षात आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण एका सोन्या-चांदीच्या दुकानात काम करत होता. तो व्यवसायातील ५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम बॅगेत भरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होता. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी लहान असो वा मोठी, संधी मिळताच ते हात साफ करतात. या चोरानेही तरुणाच्या बेसावधपणाची अचूक संधी साधत काही सेकंदात एवढी मोठी रक्कम लंपास केली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर नेटीझन्सकडून संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रस्त्यावरून चालताना किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना मोबाईलचा अतिवापर कसा जीवघेणा किंवा आर्थिक नुकसानीचा ठरू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध सुरू केला असून, नागरिकांनी मौल्यवान वस्तू किंवा रोकड सोबत असताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा