काणकोणचा भगीरथ: बाळकृष्ण अय्या यांच्या समाजकार्याची 'मन की बात'मध्ये दखल

इंजिनिअर्सनी ज्या जमिनीला खडकाळ म्हणून नाकारले, तिथेच खोदली ४० फुटांची विहीर आणि बदलले अनेकांचे जीवन.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
काणकोणचा भगीरथ: बाळकृष्ण अय्या यांच्या समाजकार्याची 'मन की बात'मध्ये दखल

पणजी : वय ही केवळ एक संख्या आहे; मनाची जिद्द जर पक्की असेल तर नशिब आणि निसर्गाचे कठीण खडकही माणसासमोर पाझरतात, याचा एक प्रत्यय काणकोण तालुक्यातील लोलये या ग्रामीण भागात पाहायला मिळतो. कोकणी भाषेत 'मड्डी तळप' या शब्दाचा सरळ अर्थ 'दगडांचा प्रदेश' असा होतो. अशा या पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष असलेल्या भागात राहणाऱ्या ७७ वर्षांच्या बाळकृष्ण गणेश अय्या यांनी आपल्या सुरकुतलेल्या पण कणखर हातांनी असा काही चमत्कार घडवला आहे, ज्याची नोंद आता गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत घेतली जात आहे. या अवलियाच्या अफाट इच्छाशक्तीची आणि समाजसेवेच्या अनोख्या पॅटर्नची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या रेडियो कार्यक्रमात घेतली असून, गोव्याच्या या सुपुत्राचे कार्य संपूर्ण देशासमोर कौतुकाचा विषय बनले आहे.



बाळकृष्ण अय्या हे मूळचे काणकोणच्या लोलये गावचे रहिवासी असून ते एक निवृत्त कला शिक्षक आहेत. त्यांच्या घराभोवतीचा परिसर पूर्णपणे खडकाळ आहे. या भागात पाण्याचा थेंबही मिळणे कठीण असल्याने मोठे अभियंते आणि पाणी तज्ज्ञ या जमिनीला निरुपयोगी ठरवून निघून गेले होते. वर दगड, खाली चिकणमाती आणि त्याखाली गडद काळा कठीण पाषाण अशा आव्हानात्मक रचनेमुळे इथे पाणी मिळणे निव्वळ अशक्य असल्याचे सर्वांचे मत होते. मात्र, जेव्हा संपूर्ण गावाने उन्हाळ्यात पाण्याच्या तीव्र टंचाईसमोर शरणागती पत्करली होती, तेव्हा अय्या यांच्या डोळ्यांनी दगडांच्या = आत दडलेला आशेचा किरण पाहिला. लोकांनी त्यांना वेड्यात काढले, पैसे वाया घालवत असल्याची टीका केली; पण अय्या यांनी स्वतः  विहीर खोदण्याचे काम सुरू केले. तब्बल ४० फुटांची खोली गाठल्यानंतर त्या कठीण पाषाणातून पाण्याचा जो जिवंत झरा उसळला, तो केवळ पाण्याचा नव्हता, तर एका माणसाच्या अदम्य आत्मविश्वासाचा विजय होता.


Miracle oasis: Hero's breakthrough for parched community | Goa News - Times  of India


हा संघर्ष इथेच संपला नाही. खरा मानवी दृष्टिकोन तेव्हा समोर आला, जेव्हा बालकृष्ण यांनी त्या विहिरीचे पाणी फक्त स्वतःच्या घरापुरते मर्यादित न ठेवता, खाली पंप बसवून स्वतःच्या खर्चाने गावभर पाईपलाईनचे जाळे विणले. आज मड्डी तळप परिसरातील २५ हून अधिक गरीब आणि गरजू कुटुंबांच्या घरात या ७७ वर्षांच्या भगीरथामुळे मोफत आणि शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचत आहे.




त्यांच्या या सामाजिक कार्याविषयी अधिक माहिती देताना त्यांचे सुपुत्र हेमंत अय्या म्हणाले की, आता परिसरात सरकारतर्फे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारच्या या पाण्याचा वापर मुख्यतः बागायतीसाठी केला जातो; मात्र घरगुती वापरासाठी आणि पिण्यासाठी आम्ही आमच्याच विहिरीचे पाणी वापरतो. ही विहीर खणताना प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुमारे २३ फूट खोल गेल्यानंतर कामगारांना ऑक्सिजन मिळणे कठीण झाले होते. अशा वेळी विहिरीच्या बाजूने खोदकाम करून खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली. माझे वडील गेल्या ४५ वर्षांपासून श्रीगणेशाच्या मूर्ती घडवण्याचे काम करत आहेत. याशिवाय 'मड्डी तळप' येथील मारुती मंदिरातील मूर्तीची स्थापनाही त्यांनीच केली असून, ती मूर्ती स्वतः बाबांनीच साकारलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात बाबांच्या या कार्याचा गौरव केल्याने आम्हा सर्व कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना अत्यंत आनंद झाला आहे


Real Hero Story,पंडित, टीचर, मूर्तिकार, झाड़ू मेकर, मिलिए सूखे गांव में  चट्टानें तोड़ 40 फीट से पानी निकालने वाले 76 साल के बालकृष्ण से -  balakrishna ayya dug ...


बाळकृष्ण अय्या यांचे संपूर्ण जीवनच एका मोठ्या प्रेरणादायी ग्रंथासारखे आहे. त्यांचे हात कधीच रिकामे बसत नाहीत. १७ वर्षे पैंगिण येथील श्रद्धानंद विद्यालयात कला शिक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर २००२ मध्ये ते निवृत्त झाले. पण उपजीविका आणि कलेची साधना म्हणून त्यांनी गणेशचतुर्थीला सुंदर मूर्ती घडवणे सुरू ठेवले. ते उत्तम पंडित असून गावात पौरोहित्याचेही काम करतात. वयाच्या ७७ व्या वर्षीही अत्यंत फुर्तीने, ते स्वतः डिझाईन केलेल्या एका विशेष चाकूच्या साहाय्याने नारळाच्या झावळ्यांपासून अत्यंत सुबक, हलके आणि टिकाऊ झाडू तयार करतात. त्यांनी साकारलेल्या कलाकृतींना संपूर्ण काणकोण परिसरात मोठी मागणी आहे. या झाडूंच्या विक्रीतून ते आपले घर चालवतात.


Real Hero Story,पंडित, टीचर, मूर्तिकार, झाड़ू मेकर, मिलिए सूखे गांव में  चट्टानें तोड़ 40 फीट से पानी निकालने वाले 76 साल के बालकृष्ण से - balakrishna  ayya dug ...


जे ज्ञान तुमच्या मृत्यूनंतर तुमच्यासोबतच नष्ट होते, त्याचा काय उपयोग? आणि जी शोधवृत्ती तुमच्या शेजाऱ्याच्या सुखासाठी कामी येत नाही, ती व्यर्थ आहे, हा बालकृष्ण अय्या यांचा विचार आजच्या स्वार्थी जगात माणुसकीचे मोठे तत्त्वज्ञान शिकवून जातो. २०१० मध्ये त्यांना मिळालेला 'कला गौरव पुरस्कार' असो वा २०२३ मध्ये गोवा राज्य जैवविविधता मंडळाने दिलेला सन्मान असो, अय्या या पुरस्कारांच्या पलीकेडे जाऊन आज केवळ सेवेचा ध्यास घेत काम करत आहेत. तरुणांना ही पारंपरिक कौशल्ये शिकता यावीत म्हणून शाळांमध्ये याचे रीतसर अभ्यासक्रम सुरू व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे. अशा या जमिनीशी जोडलेल्या खऱ्याखुऱ्या नायकाची कहाणी आज संपूर्ण गोव्याला आणि देशाला अभिमान वाटायला लावणारी आहे.


goa | The Times Of India