दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांची गोवा डेअरीवर धडक

गायीच्या दुधाला ६ तर म्हशीच्या दुधाला १० रुपये दरवाढीचे आश्वासन हवेतच

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांची गोवा डेअरीवर धडक

पणजी : राज्य सरकार आणि प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी मिळूनही दुधाच्या खरेदी दरात अपेक्षित वाढ न मिळाल्यामुळे गोव्यातील दूध उत्पादक शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि हक्काच्या दरवाढीसाठी 'अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटना' तसेच 'गोवा डेअरी फार्मर्स असोसिएशन'च्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी आज, १ जून रोजी गोवा डेअरीच्या फोंडा येथील मुख्य कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट व्यवस्थापकीय संचालकांच्या (एमडी) केबिनमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले.




या आंदोलनाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना 'गोवा डेअरी फार्मर्स असोसिएशन'चे अध्यक्ष संजीव कुंकळयेकर यांनी सांगितले की, गोव्याचे मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनाने गोवा डेअरीच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गायीच्या दुधाला प्रतिलिटर ६ रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये दरवाढ जाहीर केली होती. मात्र, हे आश्वासन देऊन दोन महिने उलटले तरीही शेतकऱ्यांच्या पदरात अजून एक रुपयाचीही वाढ पडलेली नाही. वाढत्या महागाईच्या काळात पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असताना, हक्काची दरवाढ रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.


Goa Dairy will give you free milk packets if you recycle - ItsGoa


शेतकऱ्यांनी या आंदोलनाची ४ दिवसांची रीतसर पूर्वसूचना प्रशासनाला दिली होती. त्यानुसार आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सर्व शेतकरी व्यवस्थापकीय संचालकांना जाब विचारण्यासाठी डेअरीत दाखल झाले. मात्र, यावेळी प्रशासनाकडून कमालीची टोलवाटोलवी पाहायला मिळाली. व्यवस्थापकीय संचालकांनी आपल्याला याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे सांगत थेट जबाबदारी झटकली, तर डेअरीचे संचालक डॉ. रामा परब हे शेतकऱ्यांना सामोरे जाण्यास किंवा कोणतेही स्पष्टीकरण देण्यास तयार झाले नाहीत. प्रशासकीय समितीच्या इतर सदस्यांच्या अनुपस्थितीवरही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. जोपर्यंत दुधाच्या वाढीव दराबाबत प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन किंवा स्पष्ट निर्णय मिळत नाही, तोपर्यंत गोवा डेअरीच्या कार्यालयातून एकही शेतकरी हलणार नाही, असा आक्रमक आणि तठस्थ पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

Top Milk Dairy in Margao - Best Doodh Wala Goa near me - Justdial



हेही वाचा