पैशांच्या जुन्या वादाला खूनी वळण; जिवलग मित्राला वाचवताना तरुणाचा मृत्यू

नांदेडच्या हदगावमधील घटना.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
पैशांच्या जुन्या वादाला खूनी वळण; जिवलग मित्राला वाचवताना तरुणाचा मृत्यू

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे रविवारच्या मध्यरात्री पत्त्याचा डाव ऐन भरात आला होता. अचानक मित्रांमध्ये पैशांच्या किरकोळ वादाचे पर्यावसान थेट खुनी संघर्षात झाले. जिवलग मित्राला चाकूच्या हल्ल्यातून वाचवण्याच्या प्रयत्नात २३ वर्षांच्या तरुणाने आपला जीव गमावला. विजय नारायण उर्फ बाळू कदम (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र रामा मारोती गजभारे (वय २२) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास विजय आणि रामा गावात पत्त्याचा डाव खेळत असताना, तिथल्या दुसऱ्या गटातील काही मित्रांशी त्यांचा जुन्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. विजय आणि रामाने आपले हक्काचे पैसे परत मागितल्याने हा वाद आणखी विकोपाला गेला. यावेळी समोरच्या गटातील एकाने अचानक धारदार चाकू काढून रामावर जीवघेणा हल्ला केला. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी विजयने तात्काळ मध्यस्थी केली. मात्र राग आणि नशेत धुंद असलेल्या संशयिताने थेट विजयच्याच पोटावर वार केला. यात विजय घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अतिरक्तस्रावामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवून एकूण चार संशयितांपैकी दोन मुख्य संशयितांना पकडण्यात आले. उर्वरित दोन फरार संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 


हेही वाचा