चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट 'कॅफे एल मार' मध्ये घुसली; टिटोज लेनमधील घटना

सुदैवाने जीवितहानी नाही. बेफिकीरपणे वाहन चालवून इतरांचे जीव धोक्यात घालण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट 'कॅफे एल मार' मध्ये घुसली; टिटोज लेनमधील घटना

पणजी : कळंगूटमधील अत्यंत गजबजलेल्या आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या टिटोज लेनवरील 'कॅफे एल मार' या प्रसिद्ध कॅफेत एक भरधाव कार थेट घुसल्याची धक्कादायक घटना घडली. वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून, प्राथमिक तपासानुसार चालक अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत होता, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या अपघातामुळे कॅफेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार अत्यंत वेगाने टिटोज लेनमधून जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट 'कॅफे एल मार'समोरील आवारात घुसली. या धडकेमुळे कॅफेच्या प्रवेशद्वारावर असलेला मोठा काचेचा दरवाजा चक्काचूर झाला. तसेच, हॉटेलच्या आवारात ठेवण्यात आलेल्या सायबिणीच्या पुतळ्याचेही नुकसान झाले. सुदैवाने, अपघात झाला त्या वेळी कॅफेच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा पुतळ्याजवळ कोणीही नागरिक अथवा पर्यटक उपस्थित नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज आता समोर आले आहे.

कळंगूट हा परिसर स्थानिक नागरिक आणि देश-विदेशातील पर्यटकांच्या वाहनांनी नेहमीच गजबजलेला असतो. अशा गजबजलेल्या भागात मद्यधुंद अवस्थेत आणि बेजबाबदारपणे वाहने चालवण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल स्थानिकांत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच कळंगूट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. अपघाताच्या वेळी चालकाने खरोखरच मद्यप्राशन केले होते का, याची खात्री करण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी केली जात असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.


हेही वाचा