रिक्त मंत्रिपदही लवकरच भरणार, मुख्यमंत्री दिल्लीहून परतले

पणजी : २०२७च्या विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारतर्फे पाठपुरावा सुरूच असून; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयी दिल्लीतही चर्चा केली आहे. एसटी आरक्षणावर दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. रिक्त मंत्रिपद लवकरच भरले जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दिल्लीत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी सीआरझेड व इतर पर्यावरणासंबंधी विषयांवर चर्चा झाली. याशिवाय केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे विविध पाणीपुरवठा प्रकल्पांवर चर्चा झाली. साळ नदी व सांतीनेज खाडीचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे.
यासाठी प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्राला पाठविण्यात येईल. यासाठी केंद्राकडून निधी अपेक्षित आहे. पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्यावर सुद्धा चर्चा झाली. दामू नाईक हे पक्षाच्या कामासाठी गेले होते. त्यांनी संघटनेविषयी पक्षाच्या नेत्यांकडे चर्चा केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व इतर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत रविवारी रात्री पुन्हा दिल्लीला गेले होते. त्यापूर्वी शुक्रवारी सत्ताधारी आमदार, मंत्री यांची संयुक्त बैठक त्यांनी घेतली होती. सोमवारी सकाळी त्यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन शाश्वत विकासावर चर्चा केली. तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी त्यांनी पाणीपुरवठा प्रकल्पांवर चर्चा केली. यानंतर आज ते गोव्यात परतले.