विम्याच्या रकमेसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव; मित्राचा खून करून पेटवली कार

२४ तासांत पोलिसांकडून पर्दाफाश; जालना येथील घटना.

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
5 hours ago
विम्याच्या रकमेसाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव; मित्राचा खून करून पेटवली कार

जालना : कर्जाच्या विळख्यातून सुटका करून घेणे आणि २० लाख रुपयांचा विमा लाटण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने स्वतःच्याच मृत्यूचा थरारक बनाव रचल्याचा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या व्यक्तीने आपल्याच एका परिचित मित्राचा खून करून त्याचा मृतदेह कारमध्ये ठेवून ती पेटवून दिली. मात्र, पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. मुख्य  दोघांना अटक करण्यात आले.

नितीन प्रभाकर गवळी (वय ३५, रा. रूपचंद नगर, अकोला) असे मुख्य संशयिताचे नाव असून तो सध्या फरार आहे. अमित फुलारे आणि आकाश गवळी अशी अटक करण्यात आलेल्या साथीदारांची नावे आहेत. या घटनेत मृत्यू झालेली व्यक्ती नाशिक येथे पेंटिंगचे काम करणारा संदीप चव्हाण (मूळ रा. उत्तर प्रदेश) असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून रोजी जाफ्राबाद-चिखली रोडवर एका अल्टो कारला अपघात होऊन ती जळून खाक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारमध्ये एक व्यक्ती जिवंत जळाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. सुरुवातीला हा मृतदेह कार मालक नितीन गवळीचाच असल्याचे समजून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

परंतु, घटनास्थळाची पाहणी आणि साक्षीदारांच्या जबाबात पोलिसांना संशय आला. पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा अपघाताचा हा बनाव नसून अत्यंत नियोजनबद्ध केलेला खून असल्याचे समोर आले. नितीन गवळी हा प्रचंड कर्जात बुडाला होता, तसेच त्याचे एका महिलेसोबतचे संबंधही गुंतागुंतीचे झाले होते. या सर्व त्रासातून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या नावाचा २० लाखांचा विमा मिळवण्यासाठी त्याने स्वतःला मृत घोषित करण्याचा कट रचला.

नितीनने नाशिकमधील ओळखीचा पेंटर संदीप चव्हाण याला गावाकडे पेंटिंगचे मोठे काम देण्याचे आमिष दाखवून बोलावून घेतले. छत्रपती संभाजीनगर येथे सर्व संशयितांनी संदीपसोबत दारूची पार्टी केली. त्यानंतर सिल्लोडकडे जात असताना संशयितांनी संदीपचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी संदीपचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि कार पेटवून दिली, जेणेकरून नितीन गवळीचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासेल.

सुरुवातीला अटक केलेल्या दोन्ही संशयितांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी ताकत दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मृतदेहाची ओळख पूर्णपणे पटवण्यासाठी पोलिसांनी संदीप चव्हाण आणि त्याच्या पालकांचे डीएनए नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. फरार मुख्य आरोपी नितीन गवळीचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा