मुद्रा कर्जाच्या आमिषाने १.१२ लाखांची ऑनलाइन लूट

शेल्डे-केपेतील महिलेला फटका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
मुद्रा कर्जाच्या आमिषाने १.१२ लाखांची ऑनलाइन लूट

पणजी : मुद्रा कर्ज योजनेच्या नावाखाली सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. फेसबुकवरील जाहिरात पाहून कर्जासाठी अर्ज केलेल्या शेल्डे- केपेतील महिलेची तब्बल १ लाख १२ हजार ११५ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

तक्रारदार महिलेने फेसबुकवरील मुद्रा कर्ज योजनेची जाहिरात पाहिल्यानंतर कर्जासाठी अर्ज केला होता. त्यानंतर स्वतःला ‘सौरभ खान’ असे सांगणाऱ्या व्यक्तीने मोबाईलद्वारे संपर्क साधून २ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले.

आरोपीने प्रक्रिया शुल्क, विमा, जीएसटी, टीडीएस, एनओसी आणि डिक्लेरेशन शुल्काच्या नावाखाली विविध टप्प्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. कर्ज मंजूर होईल आणि भरलेली रक्कम परत मिळेल, या विश्वासाने तक्रारदार मह‌िलेने आरोपीने दिलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण १,१२,११५ रुपये जमा केले.

मात्र, पैसे जमा केल्यानंतर ना कर्जाची रक्कम मिळाली, ना भरलेले पैसे परत मिळाले. त्यामुळे अज्ञात आरोपीने खोटे आश्वासन देत ऑनलाइन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.  पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा