अ. गो. क्षत्रिय मराठा समाजानंतर आता भंडारी समाज आक्रमक

जात सर्वेक्षण व जनगणनेनंतरच आरक्षणाची कार्यवाही करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
अ. गो. क्षत्रिय मराठा समाजानंतर आता भंडारी समाज आक्रमक

पणजी : अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजानंतर आता गोमंतक भंडारी समाजानेही जात सर्वेक्षण व जनगणनेनंतरच एसटी आरक्षणाची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. एसटी समाजाची अचूक माहिती व जनगणनेशिवाय आरक्षण लागू करणे अन्यायकारक ठरणार असल्याचा दावा करीत आरक्षणाची घाई करू नये, अशी मागणी केली आहे.

याबाबतचे पत्रक गोमंतक भंडारी समाजाच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी जारी केले आहे. चार दिवसांपूर्वी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने जनगणनेपूर्वी एसटी आरक्षण लागू करू नये, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली होती. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले होते.

या मागणीनंतर बुधवारी एसटी समाजाच्या नेत्यांनी प्रथम प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक व नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. आरक्षण कार्यवाहीची अधिसूचना लवकर जारी करण्याची मागणी यावेळी केली. ही मागणी होताच आता आरक्षण जनगणनेनंतरच करण्याची मागणी गोमंतक भंडारी समाजाने केली आहे. यामुळे आरक्षणाच्या कार्यवाहीवरून नवीन वाद निर्माण झाला आहे.

अद्ययावत आणि वैज्ञानिक आकडेवारीशिवाय विधानसभा मतदारसंघांचे आरक्षण निश्चित करणे हा इतर बहुसंख्य समाजांवर अन्याय ठरेल. त्यामुळे गोवा सरकारने अनुसूचित जमातीसाठी (ST) मतदारसंघ आरक्षित करण्यापूर्वी राज्यात तातडीने जात सर्वेक्षण करावे किंवा २०२७ च्या प्रस्तावित जनगणनेची वाट पहाणे योग्य ठरेल. 

'डेटा नाही, तर आरक्षण नाही' अशी स्पष्ट भूमिका समाजाने घेतली आहे. भारतातील शेवटची जात जनगणना १९३१ मध्ये झाली होती. गेल्या ९५ वर्षांत लोकसंख्येची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.  कोणत्याही ताज्या आकडेवारीशिवाय थेट मतदारसंघ आरक्षित करणे राजकीयदृष्ट्या मनमानी आणि अन्यायकारक ठरेल, अशी भीती समाजाने व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'प्रेरणा दिनी' एसटी समुदायाला आगामी विधानसभा निवडणुकीत १२% आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. केपे, सांगे, काणकोण आणि प्रियोळ हे मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित होणार असल्याच्या चर्चा  आहेत.

या चार मतदारसंघांची निवड नेमक्या कोणत्या आधारावर केली जात आहे? या भागातील एसटी लोकसंख्या आणि मतदारांची सद्यस्थितीतील अधिकृत आकडेवारी कोणाकडे आहे? हे प्रश्न भंडारी समाजाने केले आहेत.

 प्रत्यक्षात गोव्यातील इतर अनेक मतदारसंघांमध्येही एसटी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. साखळी, कुंभारजुवे, सांत आंद्रे या मतदारसंघांत एसटी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. फातोर्डा मतदारसंघात ख्रिस्ती एसटी मतदारांची संख्या अधिक आहे.

गोमंतक भंडारी समाजाच्या मागण्या :

 तातडीने सर्वेक्षण: सर्व एसटी बहुल आणि संभाव्य मतदारसंघांमध्ये लोकसंख्या व मतदार संख्या मोजण्यासाठी तातडीने 'जात सर्वेक्षण'  सुरू करावे.

 या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आल्यानंतरच कोणत्या मतदारसंघाला आरक्षण द्यायचे, हे सरकारने निश्चित करावे.

 जर तातडीने सर्वेक्षण शक्य नसेल, तर सरकारने २०२७ मध्ये होणाऱ्या प्रस्तावित राष्ट्रीय जात जनगणनेच्या अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा करावी.

शास्त्रीय माहितीशिवाय केवळ राजकीय तडजोडीसाठी जागा आरक्षित केल्यास राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो. पारदर्शकता, निष्पक्षता आणि अचूक माहितीवर आधारित निर्णय घ्यावा, अशी समाजाची मागणी आहे.


हेही वाचा