देशात आणीबाणी लागणार, मोदी वर्षभरात पंतप्रधानपद सोडणार

राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
देशात आणीबाणी लागणार, मोदी वर्षभरात पंतप्रधानपद सोडणार

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक अंदाज वर्तवले आहेत. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुढील एका वर्षात नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, देशात लवकरच भीषण आर्थिक संकट येणार असून लोकांच्या वाढत्या विरोधामुळे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या यंत्रणा आणि कवच कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, देशात लवकरच अशी आर्थिक त्सुनामी येणार आहे, जी जनतेने यापूर्वी कधीही पाहिलेली नाही. अर्थव्यवस्थेला संरक्षण देणारे कवचच सरकारने काढून टाकले आहे.
देशातील सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणातील व्यवस्था आता ढासळू लागली असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोग, गुप्तचर यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेतील काही घटकांकडून अंतर्गत असंतोष व्यक्त केला जात असून, आपल्याला तिथून थेट मेसेज येत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. पूर्वी पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात असलेल्या संस्था आता स्वतंत्रपणे विचार करू लागल्या आहेत आणि व्यवस्थेच्या आतूनच सत्तेच्या विरोधात आवाज उठवला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
लोकांमधील वाढता असंतोष आणि जनक्षोभ दडपण्यासाठी सरकार कठोर पावले उचलू शकते, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली. जनतेचा दबाव वाढल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्ष देशात आणीबाणीसारख्या कठोर उपाययोजना लागू करू शकतो, असे ते म्हणाले.
राजकीय वाद पेटण्याची चिन्हे
राहुल गांधी यांनी केलेले हे दावे त्यांच्या वैयक्तिक राजकीय आकलनावर आधारित असून, त्यांनी यासंदर्भात कोणताही अधिकृत पुरावा सादर केलेला नाही. मात्र, पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाबाबत आणि देशाच्या सुरक्षेबाबत केलेल्या या विधानांमुळे आता सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये नवा राजकीय कलगीतुरा रंगण्याची दाट शक्यता आहे. यावर आता सरकार पक्षाकडून काय उत्तर येते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा