जयपूरमध्ये इबोलाचा संशयित रुग्ण आढळल्याने सतर्कता वाढली

युगांडाहून आलेली १९ वर्षीय पर्यटक युवती विलगीकरणात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
जयपूरमध्ये इबोलाचा संशयित रुग्ण आढळल्याने सतर्कता वाढली

 जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये इबोला सदृश लक्षणे आढळलेल्या १९ वर्षीय युगांडातील पर्यटक युवतीला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तिचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील विशेष प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अद्याप इबोला संसर्गाची पुष्टी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  

शुक्रवारी शारजाहहून आलेल्या या युवतीला विमानतळावर प्राथमिक तपासणीनंतर थेट राजस्थान युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (RUHS) (आरयुएचएस) रुग्णालयातील विशेष विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथक तिच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिल गुप्ता यांनी सांगितले की, रुग्णामध्ये इबोला विषाणूजन्य आजाराशी मिळतीजुळती काही लक्षणे दिसून आल्याने खबरदारी म्हणून विलगीकरण करण्यात आले आहे. सर्व वैद्यकीय प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुरू आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) सुरू केली आहे.  संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा केली जात आहे. गरज पडल्यास त्यांची तपासणी आणि देखरेख केली जाणार आहे.

आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष

या घटनेनंतर राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य संचालक रवी प्रकाश शर्मा यांनी सांगितले.

संभाव्य इबोला परिस्थिती हाताळण्यासाठी आरयुएचएस (RUHS) रुग्णालयाला राज्यातील विशेष केंद्र घोषित करण्यात आले आहे.  येथे विशेष विलगीकरण वॉर्ड, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, पीपीई (PPE) किट आणि आवश्यक औषधसाठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, भारतात आतापर्यंत इबोलाच्या बंडिबुग्यो प्रकाराचा एकही पुष्टी झालेला रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा