‘नीट’ पेपरफुटीवरून जंतर-मंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे ५ तास ठिय्या आंदोलन

शिक्षणमंत्र्यांना ५ दिवसांचा अल्टिमेटम : अन्यथा १३ जूनला पुन्हा तीव्र आंदोलन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
‘नीट’ पेपरफुटीवरून जंतर-मंतरवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे ५ तास ठिय्या आंदोलन

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट’ परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फूट आणि गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राजधानीत राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ ‘कॉक्रोच जनता पार्टी’तर्फे शनिवारी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर तब्बल पाच तास जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील पाच दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या शनिवारी, १३ जून रोजी पुन्हा एकदा दिल्लीत भव्य आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सोनम वांगचुक यांनी अभिजीत दीपके यांच्यासह मंचावर जाऊन आंदोलकांना शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याचे आवाहन केले.

सीजेपी प्रमुख अभिजित दीपके हे शनिवारी सकाळीच अमेरिकेच्या दौऱ्यावरून दिल्लीत परतले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ते थेट जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनाला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दिला. वांगचुक यांनी अभिजित दीपके यांच्यासोबत मंचावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना संबोधित केले. कोणत्याही परिस्थितीत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानेच निदर्शने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या आंदोलनात पक्षाचे प्रवक्ते आणि आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दिल्लीतील जंतरमंतरजवळ कडक पोलीस बंदोबस्त होता.
दिल्लीच्या सीमांवर कडक नाकेबंदी; १,००० हून अधिक जवान तैनात
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवली होती. जंतर-मंतर परिसरासह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुख्य रेल्वे स्थानके, आंतरराज्यीय बस स्थानके आणि दिल्लीच्या सर्व सीमांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी १,००० हून अधिक दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. संवेदनशील बाजारपेठांमध्येही गस्त वाढवण्यात आली होती.


‘नीट’चा वाद चिघळणार

आंदोलनाच्या सांगतेवेळी बोलताना अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या पेपरफुटीच्या मागे मोठे रॅकेट असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागून ५ दिवसांत पदमुक्त व्हावे. हा आमचा अंतिम इशारा (अंतिम मुदत) असून, सरकारने दखल न घेतल्यास १३ जून रोजी जंतर-मंतरवर याहून मोठे आंदोलन केले जाईल, असे दीपके यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे आता ‘नीट’ परीक्षेचा वाद दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा