सोलापूर जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी बनले 'एक दिवसाचे सरपंच'

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
6 hours ago
सोलापूर जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी बनले 'एक दिवसाचे सरपंच'

सोलापूर : विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा अनुभव देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. 'आजचा विद्यार्थी, उद्याचा लोकप्रतिनिधी' या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना 'एक दिवसाचा सरपंच' होण्याची संधी दिली जात आहे.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीने ४ जून रोजी या उपक्रमाची सुरुवात केली. पाचवी व आठवीची स्कॉलरशिप परीक्षा आणि नवोदय प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या १३ गुणवंत विद्यार्थ्यांची वलसांग, खानापुर, अंत्रोली आणि निंबार्गी या गावांमध्ये 'एक दिवसाचा सरपंच' म्हणून नियुक्ती करण्यात आली. दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाल सरपंचांचे गावांमध्ये जंगी स्वागत करून त्यांना मानाने सरपंचपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. यावेळी त्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. 

आपली जबाबदारी सांभाळताना या बाल सरपंचांनी गावातील शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. गावातील समस्या समजून घेत त्यांनी शाळेच्या छतांची दुरुस्ती, नवीन ग्रंथालय, खेळाचे मैदान, स्वच्छतागृहांची सोय आणि अखंड वीजपुरवठा यांसारखे महत्त्वपूर्ण सल्ले प्रशासनाला दिले.

विशेष म्हणजे, या मुलांनी मांडलेले प्रस्ताव ग्रामसभेत मंजूर करून त्यावर प्रत्यक्ष काम केले जाणार आहे. तसेच, या विकासकामांचे उद्घाटनही संबंधित विद्यार्थ्यांच्याच हस्ते केले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात कौतुकाचा वर्षाव होत असून, भावी लोकप्रतिनिधी घडवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

हेही वाचा