सायबर विभागाने कोझिकोड-केरळ येथून केली संशयिताला अटक; तपास सुरू.

पणजी : ऑनलाईन ट्रेडिंगच्या जाळ्यात ओढून तिसवाडी तालुक्यातील करमळी येथील एका ५५ वर्षीय महिलेची तब्बल ४ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या हाय-प्रोफाईल गुन्ह्याचा छडा लावत गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून मुख्य संशयित रेजस अली पी. पी. याला कोझिकोड (केरळ) येथून अटक करण्यात यश मिळवले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ पूर्वी, संशयितांनी संघटितपणे विविध मोबाईल क्रमांकांचा वापर करून तक्रारदार महिलेशी संपर्क साधला. ‘सिटाडेल सिक्युरिटी’ या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हुबेहूब मूळ प्लॅटफॉर्मसारखे दिसणारे एक डमी ‘सिटाडेल सिक्युरिटी’ अॅप्लिकेशन (अॅप) मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास भाग पाडले. या खोट्या अॅपच्या माध्यमातून शेअर बाजारातील व्यवहार आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक केल्यास अफाट नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. डिजिटल स्क्रीनवर दिसणाऱ्या खोट्या नफ्याच्या आकड्यांवर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ४.२३ कोटी रुपयांची प्रचंड रक्कम हस्तांतरित केली. मात्र, जेव्हा ही रक्कम काढण्याची वेळ आली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२) आणि ३(५) सह माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याचे प्रचंड गांभीर्य आणि मोठी रक्कम लक्षात घेऊन सायबर पोलिसांच्या पथकाने तातडीने तांत्रिक आणि फॉरेन्सिक आर्थिक तपास सुरू केला. बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करत असताना पोलिसांना केरळमधील कोझिकोड येथील एका संशयास्पद खात्याचा सुगावा लागला. सायबर पोलीस उपनिरीक्षक नवीन नाईक, पोलीस कॉन्स्टेबल यश कोळे आणि सिद्धरामय्या मठ यांच्या विशेष पथकाने तातडीने केरळ गाठून रेजस अली याला अटक केली.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फसवणुकीच्या रकमेतील २७ लाख रुपये थेट रेजस अली याच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात जमा झाले होते. त्यानंतर ही रक्कम त्याच्या इतर साथीदारांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. पोलिसांच्या सखोल विश्लेषणात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली की, संशयिताचे हेच बँक खाते कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील इतर दोन मोठ्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांशीही लिंक आहे, येथेही सुमारे ४.२१ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अटक केलेल्या संशयिताला गोव्यात आणून न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सायबर क्राईमचे पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी आणि पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली या टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.