भंगार गोळा करणार्याविरोधात तक्रार दाखल

मडगाव : बोर्डा-फातोर्डा येथे एका पाळीव जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याची चोरी करून त्याची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीने फातोर्डा पोलीस ठाण्यात एका भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. ‘जिमी’ असे चोरी झालेल्या या कुत्र्याचे नाव आहे.
डीएसपीसीए दक्षिण गोव्याच्या कार्यकारी सचिव व्हर्जिनिया सिमोज आणि अधिकारी राज प्रतीक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ५ जून रोजी दुपारी बोर्डा येथील एका खासगी मालमत्तेत संबंधित भंगार विक्रेत्याने बेकायदेशीर प्रवेश केला. तेथून त्याने ‘जिमी’ नावाच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याला चोरले. चोरी केल्यानंतर संशयिताने त्या कुत्र्याला सुरावली येथे नेले आणि तेथील एका प्राणीप्रेमीला साडेचार हजार रुपयांना विकले.
कुत्रा घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरलेल्या मालकाने तत्काळ सोशल मीडियावर (समाजमाध्यमांवर) त्याचा फोटो आणि माहिती शेअर केली. या पोस्टमुळे त्याच दिवशी रात्री उशिरा कुत्र्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. सुदैवाने, दुसऱ्या दिवशी तो कुत्रा स्वतः चालत आपल्या मूळ मालकाच्या घरी परतला. मात्र, या सर्व प्रकारामुळे कुत्र्याची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात आले.
प्राणीमालकांना सतर्क राहण्याचे आवाहन
या प्रकरणाची गंभीर दखल घेत डीएसपीसीएच्या अधिकाऱ्यांनी फातोर्डा पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवून संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पाळीव प्राण्यांच्या मालकांनी अधिक सतर्क राहावे आणि आपल्या प्राण्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन व्हर्जिनिया सिमोज यांनी केले आहे. फातोर्डा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.