
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आंबोली हे फक्त धबधबे आणि धुके यासाठीच प्रसिद्ध नाही, तर येथे आढळणाऱ्या अद्भुत जीवसृष्टीमुळेही महत्त्वाचे आहे. आंबोलीच्या जंगलात आणि धबधब्यांच्या परिसरात एक अत्यंत दुर्मिळ गोड्या पाण्यातील खेकडा आढळतो. हा अतिशय लहान खेकडा असून जगात तो केवळ महाराष्ट्रातील आंबोली परिसरातच आढळतो. त्यामुळे तो स्थानिक म्हणजे स्थानविशिष्ट प्रजाती मानला जातो.
'ग्युबरनेटोरियाना लाँगीपेस' (Gubernatoriana longipes) असे शास्त्रीय नाव असलेल्या या खेकड्याला स्थानिक पातळीवर 'फॉल-बेस क्रॅब' (धबधब्याच्या तळाशी राहणारा खेकडा) म्हणून ओळखले जाते. प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ एस. के. पती आणि तेजस ठाकरे यांनी २०१८ मध्ये या खेकड्याचा शोध लावला. त्याची सर्वांत ठळक ओळख म्हणजे शरीराच्या मानाने खूप लांब चालण्याचे पाय. ज्यामुळे याला 'लाँगीपेस' हे नाव देण्यात आले आहे. साधारण २ सेंटीमीटर आकाराच्या या चिमुकल्या खेकड्यांमध्ये 'पोलिक्रोम्याटिझम' (Polychromatism) आढळते. म्हणजेच, नरांच्या पाठीवरील कवचाचा रंग करड्या रंगापासून ते थेट चमकदार गुलाबी रंगापर्यंत बदलतो. नरांची एक नांगी दुसऱ्या नांगीपेक्षा आकाराने बराच मोठी असते, जी दिसायला अत्यंत आकर्षक वाटते.

हे खेकडे केवळ उभे कडे, खडकाळ भाग आणि वाहत्या धबधब्यांच्या कडेलाच वास्तव्यास असतात. दिवसा अत्यंत सक्रिय असणारे हे जीव प्रामुख्याने शेवाळ, कीटकांच्या अळ्यांना आपले भक्ष्य बनवतात. पावसाळ्यात आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांना हे खेकडे धबधब्यांच्या खडकांवर मोठ्या संख्येने फिरताना सहज पाहायला मिळतात.
मात्र, या सुंदर खेकड्याचे अस्तित्व धोक्यात आहे. कारण त्याचा अधिवास अत्यंत मर्यादित आहे. जंगलतोड, भूस्खलन, पाण्याचे प्रदूषण, पर्यटनामुळे होणारा त्रास यासारख्या अनेक कारणांमुळे त्यांची संख्या कमी होऊ शकते. पर्यटकांनी खेकडे हातात घेणे, पकडणे किंवा त्यांच्यावर पाय पडेल अशा पद्धतीने धबधब्याजवळ फिरणे टाळावे. हा खेकडा लहान असला, तरी आंबोलीच्या निसर्गवैभवाचा मौल्यवान वारसा आहे.