भारताने अमेरिकेच्या उपराजदूतांना समन्स बजावत नोंदवला निषेध

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजांना लक्ष्य करण्याच्या घटना सुरूच आहेत. गेल्या चार दिवसांत भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर झालेला हा तिसरा हल्ला आहे.
गिनी-बिसाऊच्या ध्वजाखालील एमव्ही जलवीर (MV Jalveer) या डांबर वाहून नेणाऱ्या टँकरवर गुरुवारी (११ जून) हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईत टँकरवर हल्ला झाल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय बंदर, नौकावहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal) यांनी दिली.
यापूर्वी सेटेबेलो (Settebello) या टँकरवर अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली. या प्रकरणी भारताने अमेरिकेच्या उपराजदूतांना समन्स बजावत तीव्र निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दोन्ही देशांकडून सलग दुसऱ्या दिवशी हवाई हल्ले झाल्याचा दावा करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणने तातडीने शांतता करार मान्य न केल्यास आणखी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर कारवाई करणार: इराण
इराणच्या लष्करी नेतृत्वाने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या कोणत्याही जहाजावर कारवाई करण्याची धमकी दिली असून, सामुद्रधुनी पूर्णपणे बंद असल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला. मात्र अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळला आहे.
सामुद्रधुनी बंद नसून व्यापारी जहाजांची वाहतूक सुरू असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. या घटनांमुळे आखाती भागातील समुद्री वाहतूक, ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.