म्हणाले-केंद्राच्या कल्याणकारी योजनांमुळे लाखो गोमंतकीयांचे जीवन बदलले

पणजी : कलम ३७० रद्द करून अखंड भारताचे स्वप्न साकार करणे, देश दहशतवाद व नक्षलवादमुक्त करणे आणि भव्य राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करणे, ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील तीन मोठी कार्ये आहेत. एनडीएच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात गोव्याचाही विकास झाला असून, गोमंतकीयांना याचा मोठा लाभ मिळाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
देशहितासाठी या भारतात 'दो विधान, दो निशान और दो प्रधान' असणे योग्य नव्हते. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धाडसी निर्णय घेत कलम ३७० रद्द केले आणि जम्मू-काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी देशातील नक्षलवाद आणि दहशतवादही मोडीत काढला, तसेच अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी करून कोट्यवधी जनतेचे स्वप्न साकार केले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेला हजेरी लावून शुक्रवारी गोव्यात परतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, वीज मंत्री सुदिन ढवळीकर आणि वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.
केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत देशात राबवलेली विकासाची कामे आणि विविध कल्याणकारी योजनांची उपलब्धी मुख्यमंत्र्यांनी या वेळी आकडेवारीसह मांडली. गेल्या १२ वर्षांत देशात ७० लाख कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) झाली आहे. विमानतळांची संख्या दुप्पट झाली असून, वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८४२ वरून थेट २,१०० वर पोहोचली आहे. २००४ ते २०१४ या काळात राज्यांना केंद्रीय करांच्या शुल्कापोटी केवळ २,०७६ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, तर गेल्या १२ वर्षांत तब्बल ११,८१२ कोटी रुपयांचा निधी राज्यांना मिळाला आहे.
गोव्याला झालेला विविध योजनांचा लाभ:
२९९ किमी महामार्ग : उभारणीसाठी ९९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर.
मोपा लिंक रोड : दळणवळण सुलभतेसाठी १,१८३ कोटी रुपये खर्च.
रेल्वे विकास : २४ किमी रेल्वे मार्गाचे यशस्वी विद्युतीकरण.
वंदे भारत एक्सप्रेस : मडगाव-मंगळूर आणि मडगाव-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू.
रेल्वे स्थानक विकास : 'अमृत' योजनेअंतर्गत मडगाव, सावर्डे आणि वास्को स्थानकांचा कायापालट.
मनोहर (मोपा) आंतरराष्ट्रीय विमानतळ : २,८७० कोटी रुपये खर्चून आधुनिक उभारणी.
पर्यटन वाढ : 'स्वदेश' दर्शन योजनेअंतर्गत १९७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त.
पीएम जनधन योजना : गोव्यात २.२७ लाख नवीन बँक खाती उघडली.
मुद्रा योजना : तरुणांना स्वयंरोजगारासाठी ५.७८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप.
पीएम स्वनिधी योजना : ३ हजार स्थानिक पथविक्रेत्यांना थेट लाभ.
पीएम सुरक्षा विमा योजना : राज्यातील ८ लाख नागरिकांची नोंदणी.
पीएम जीवनज्योति विमा योजना : ४ लाख नागरिकांना सुरक्षा कवच.
अटल पेन्शन योजना : १ लाख १८ हजार नागरिकांची यशस्वी नोंदणी.
पीएम गरीब कल्याण योजना : ५ लाख गरजूंना मोफत शिधा व लाभ.
किसान क्रेडिट कार्ड : २५ हजार शेतकऱ्यांची खाती नोंदवून डिजिटल आर्थिक जोडणी.
शेती विकास : ९१५ हेक्टर शेतजमीन अत्याधुनिक सिंचनाद्वारे ओलिताखाली आणली.
पीएम पीक विमा योजना : ५,८९२ शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीविरुद्ध विमा संरक्षण.
मत्स्य संपदा योजना : गोव्यातील कोळी बांधवांसाठी १२६ कोटी रुपयांचा निधी.
मासेमारी पायाभूत सुविधा : जेट्टी व इतर सुविधांसाठी ११.२४ कोटी रुपयांची तरतूद.
आखाती देशांमधील युद्ध आणि इतर जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असल्या, तरी केंद्र सरकारने आयकरात सवलत देऊन सर्वसामान्यांच्या हातात अधिक उत्पन्न दिले आहे आणि इतर अनेक सवलतीही कायम ठेवल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितले.
.. म्हणूनच मी मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकावर : माविन
भाजप कधीच धर्मावर आधारित राजकारण करत नाही. पक्षामध्ये धर्माचे राजकारण केले जात नसल्यामुळेच, आज वरिष्ठतेनुसार मी मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकाचा मंत्री आहे, असे प्रतिपादन राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक देतो. याच सर्वसमावेशक धोरणामुळे आज ईशान्येकडील ख्रिश्चनबहुल राज्यांमध्येही भाजपला मोठे यश मिळाले आहे. आता केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला पंतप्रधान मोदींच्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे.