अटकेनंतर चालकाची जामिनावर सुटका

पणजी : सांताक्रुझ येथील मातृछाया रुग्णाश्रयाजवळ कार आणि दुचाकी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार जुझे गुरजांव (वय ७९, रा. सांताक्रुझ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी कार चालक शिवेंदू कवळेकर (वय ४६, रा. सांताक्रुझ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास मातृछाया रुग्णाश्रयाजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक गौरीश मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिनेश मुळगावकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, हा अपघात फोर्ड फिगो कार आणि सुझुकी ॲक्सेस दुचाकी यांच्यात झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले की, कार चालक शिवेंदू कवळेकर हा सांताक्रुझहून बांबोळीच्या दिशेने जात होता. मातृछाया रुग्णाश्रमाजवळ आल्यावर त्याने कार बेदरकार व निष्काळजीपणे चालवल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्याच वेळी त्याने समोरून जाणाऱ्या सुझुकी ॲक्सेस दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक जुझे गुरजांव हे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जुने गोवा पोलीस हवालदार दिनेश मुळगावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला असून, पोलीस उपनिरीक्षक संकेत पोखरे यांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.