म्हणाले- वीजखाते जनजागृती करण्यात पूर्णपणे अपयशी; म्हणूनच मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला

पणजी : 'स्मार्ट मीटर' आणि वाढीव बिलांच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी वीज खात्याचे जाहीर कान टोचले आहेत. वीज खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे आणि हा सर्व गोंधळ निर्माण झाला असून, हे खाते स्मार्ट मीटरबाबत जनतेमध्ये पुरेशी जनजागृती करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. याच कारणांमुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या प्रकरणात स्वतःहून हस्तक्षेप करावा लागला, असेही ते म्हणाले.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दामू नाईक बोलत होते. स्मार्ट मीटर आणि वाढीव बिलांमुळे जनतेमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर आणि असंतोषावर भाजप संघटनेचे बारीक लक्ष होते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी या वेळी दिली.
थेट वाढीव बिले देणे चुकीचे!
दामू नाईक पुढे म्हणाले की, शासकीय योजना किंवा नवे तंत्रज्ञान राबवताना लोकांमध्ये त्याविषयी जागृती निर्माण करणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, हे करण्यात वीज खाते कमी पडले आहे. वीज अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन संवाद साधायला हवा होता. कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा ग्राहकांना विश्वासात न घेता थेट वाढीव बिले देणे अत्यंत चुकीचे आहे. वीज खात्याच्या याच ढिसाळ कारभारामुळे मुख्यमंत्र्यांना जनतेच्या हितासाठी योग्य वेळी हस्तक्षेप करावा लागला, असेही त्यांनी नमूद केले.
लोड वाढीबाबत ग्राहकांना विश्वासात घ्यायला हवे होते
बदलेल्या जीवनशैलीचा दाखला देत नाईक यांनी सांगितले की, २५-३० वर्षांपूर्वी लोकांच्या गरजा मर्यादित होत्या. त्या काळी घरांमध्ये इस्त्री, गिझर, वातानुकूलन यंत्रणा (एसी) किंवा एकापेक्षा जास्त टीव्ही नसायचे. त्यामुळे ग्राहकांनी त्या काळातील गरजेनुसार कमी लोडची (भार) मागणी करून मीटरसाठी अर्ज केले होते.
परंतु, बदलत्या काळात घरात एसी किंवा इतर उपकरणे बसवल्यास लोड वाढतो आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते, हे साध्या ग्राहकाला समजत नाही. अशा वेळी वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी ग्राहकांच्या घरांना भेटी देऊन, त्यांना लोड वाढवण्यासाठी अर्ज करण्याची विनंती व मार्गदर्शन करायला हवे होते. हे महत्त्वाचे काम करण्यात वीज खाते अपयशी ठरल्याचा थेट आरोप नाईक यांनी केला.
गोव्यातील ग्राहक प्रामाणिक
गोव्यात विजेची चोरी कोणीही करत नाही. येथील ग्राहक प्रामाणिक असून ते जितकी वीज वापरतात, तितके बिल भरण्यास नेहमीच तयार असतात. योग्य बिलाबाबत जनतेची कोणतीही तक्रार नसते, असे सांगत दामू नाईक यांनी ग्राहकांची पाठराखण केली. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेत वीज खात्याकडून ज्या चुका आणि त्रुटी झाल्या आहेत, त्या सरकारने प्रामाणिकपणे मान्य केल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.