अनमोड घाटात नियंत्रण सुटल्याने टिप्पर थेट दरीत; प. बंगालच्या चालकाचा मृत्यू

कर्नाटकमधून गोव्यात करत होता वाळूची वाहतूक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
9 hours ago
अनमोड घाटात नियंत्रण सुटल्याने टिप्पर थेट दरीत; प. बंगालच्या चालकाचा मृत्यू

जोयडा : कर्नाटकातून गोव्याच्या दिशेने वाळूची वाहतूक करणारा एक टिप्पर अनमोड घाटातील दूधसागर मंदिराजवळ शनिवारी मध्यरात्री दुर्घटनाग्रस्त झाला. या दुर्घटनेत टिप्परचालक सुदीप कापोझ (रा. पश्चिम बंगाल) यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूने भरलेला हा टिप्पर कर्नाटकातून गोव्याकडे येत असताना अनमोड घाटातील एका धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेला संरक्षक कठडा तोडून थेट ३० ते ५० फूट खोल दरीत कोसळला.

हा अपघात इतका भीषण होता की, टिप्परच्या केबिनचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला. त्यामुळे चालक सुदीप यांचा मृतदेह केबिनमध्येच अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच फोंडा अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर केबिन कापून मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो कुळे पोलिसांच्या ताब्यात दिला. कुळे पोलीस या अपघात प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा