आमचा शेजारी गुन्हेगारी प्रवृत्तीचा. हातात कोयता घेऊन फिरतो, आम्हाला धमकावितो-पीडित कुटुंबाची तक्रार

पर्वरी : सुकुर-पर्वरी येथील जोशवाडा भागात एका मुक्या जनावरावरील क्रूरतेची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दोन मांजरांच्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या मांजराला लाकडी दांडक्याने (काठीने) बेदम मारहाण करून जीवे मारल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित मांजर मालकाने पर्वरी पोलीस ठाण्यात संशयित शेजाऱ्याविरुद्ध रीतसर तक्रारही दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११ ते ११:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार कुटुंबातील महिला आणि त्यांचे कुटुंबीय घरात विश्रांती घेत होते, त्यावेळी बाहेर मांजरांच्या ओरडण्याचा आवाज आला. बाहेर पाहिले असता, तक्रारदारांचे मांजर आणि शेजाऱ्याचे मांजर यांच्यात भांडण सुरू होते. याच वेळी संशयित शेजारी हातात मोठा लाकडी दांडका घेऊन आला आणि त्याने दुसऱ्याच्या मांजराला लक्ष्य केले.

तक्रारदार कुटुंबातील सदस्यांनी त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ते त्या दिशेने धावले. मात्र, त्या व्यक्तीने मांजराच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने एकापाठोपाठ दोन मोठे प्रहार केले. हा वार इतका भीषण होता की, मांजराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते मांजर जमिनीवर तडफडू लागले व काही मिनिटांतच त्याचा जागीच मृत्यू झाला.

पीडित महिला आणि त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शेजाऱ्याची मानसिक स्थिती आणि वर्तणूक पहिल्यापासूनच हिंसक आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा प्राण्यांना मारहाण केली असून घराजवळील भागात कोयता घेऊन फिरणे, दगडफेक करणे अशा कृत्यांचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. चार दिवसांपूर्वीच स्थानिक पंचायतीत आणि पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या घटनेनंतरही त्याने कुटुंबाला घराबाहेर येण्याचे आव्हान देत धमकावण्याचा प्रयत्न केला.

पोलीस तक्रार आणि प्राणीप्रेमींना आवाहन
घटनेनंतर पीडित कुटुंबाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. मृत मांजरावर कुटुंबाने अत्यंत जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार केले. घरात तरुण मुली आणि ज्येष्ठ नागरिक राहत असल्याने या हिंसक शेजाऱ्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, अशी भीती या कुटुंबाने व्यक्त केली आहे. तसेच, अशा क्रूर प्रवृत्तीच्या माणसावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी गोव्यातील प्राणीप्रेमींनी (Animal Lovers) आणि संघटनांनी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पीडित कुटुंबाने केले आहे.

दरम्यान, पाळीव मांजराला काठीने मारून जीवे मारल्याप्रकरणी संशयित शेजाऱ्याविरुद्ध रीतसर एफआयआर नोंदवावा, अशी मागणी उत्तर गोवा 'जिल्हा प्राणी छळ प्रतिबंधक सोसायटी'ने (DSPCA) पर्वरी पोलिसांकडे केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३२५ आणि प्राण्यांवरील छळ प्रतिबंधक कायदा, १९६० मधील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. हा गुन्हा दखलपात्र (Cognizable) असतानाही पोलिसांनी या प्रकरणात केवळ अदखलपात्र (NC) तक्रार नोंदवला. यावर आक्षेप घेत, तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून, पोलिसांनी हा मुख्य पुरावा म्हणून जतन करावा, असे 'डीएसपीसीए'ने म्हटले आहे.