
ब्राझील : थ्रिलर आणि साहसी खेळांची आवड असणाऱ्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. बंजी जम्पिंग करताना सुरक्षेची दोरी व्यवस्थित न बांधल्यामुळे एका प्रसिद्ध २१ वर्षीय महिला इन्फ्लुएन्सरचा सुमारे १३० फूट (४० मीटर) खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. मारिया एडुआर्डा रॉड्रिग्स असे या मृत तरुणीचे नाव असून, ती ब्राझीलमधील लिमेरा शहराची रहिवासी होती. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारिया एका लोकप्रिय अॅडव्हेंचर स्पॉटवर 'रोप जम्पिंग' या साहसी खेळाचा थरार अनुभवण्यासाठी आली होती. उडी मारण्यापूर्वी तिने या अनुभवाविषयी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. मात्र, जम्पिंग प्लॅटफॉर्मवरील कर्मचाऱ्यांनी तिला उडी मारण्यासाठी पुढे नेले, पण सुरक्षेसाठी आवश्यक असलेली मुख्य दोरी तिच्या उपकरणांना बांधलीच नाही. या गंभीर चुकीकडे दुर्लक्ष करत कर्मचाऱ्यांनी तिला प्लॅटफॉर्मवरून खाली सोडले.
या दुर्घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कर्मचारी मारियाला प्लॅटफॉर्मकडे नेताना दिसत आहेत. तिने उडी मारल्यानंतर तिथे उपस्थित असलेले काही लोक दोरी बांधली नाही, दोरी बांधली नाही, असे ओरडताना ऐकू येत आहेत. मारिया खाली पडताच अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले, मात्र गंभीर दुखापतींमुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे मारियाच्या होणाऱ्या पतीला मोठा मानसिक धक्का बसला असून, प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारियाने नुकतेच 'फिजिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट'चे शिक्षण पूर्ण केले होते. ती सोशल मीडियावर फिटनेस आणि निसर्गाशी संबंधित ब्लॉगिंगमुळे लोकप्रिय होती. या घटनेनंतर ब्राझील पोलिसांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी घटनास्थळावरून ६ जणांना अटक केली. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे साहसी पर्यटन स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.