भेट देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नुकताच १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या निमित्ताने गोवा सरकारतर्फे (Goa Government) त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या महत्त्वकांक्षी योजनांची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन चार ठिकाणी आयोजित केले आहे. सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मंगळवारी त्यांनी पणजी कदंब बसस्थानक परिसरातील प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी आमदार राजेश फळदेसाई, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस व अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ असणारे पंतप्रधान बनले आहेत. त्यासाठी आम्ही गोव्यातील जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो.
त्यांच्या कार्यकाळात केंद्रातील तसेच राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे विकास कामांना गती मिळाली आहे. बारा वर्षांच्या कालावधीत नारी शक्ती, किसान शक्ती, युवा शक्ती आणि गरीब कल्याण या चार स्तंभांवर सरकार काम करत आहे. आम्ही पायाभूत सुविधांसह मानवी विकासाला देखील महत्व दिले आहे. याच आधारावर आमची विकास कामे सुरू आहेत.
ते म्हणाले, बारा वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने विविध लोकहिताच्या योजना सुरू केल्या आहेत. यांची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी देखील प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. यामुळे एखाद्या युवकाला शिष्यवृत्ती स्टँड अप इंडिया व अन्य योजनांची माहिती मिळेल. अशाच पद्धतीचे प्रदर्शन पणजीसह म्हापसा, मडगाव आणि कुडचडे येथील कदंब बसस्थानक परिसरात १६ ते १८ जून दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. याचा लोकांनी लाभ घ्यावा.
आमदार राजेश फळदेसाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील बारा वर्षे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कालावधीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय, योजना यांची माहिती प्रदर्शनातून देण्यात आली आहे. यामुळे लोकांना मागील बारा वर्षात झालेल्या देशाच्या प्रगतीची माहिती मिळेल. केंद्राप्रमाणे राज्य सरकारी ही लोकाभिमुख कामे करत आहे. माझे घर योजना हे त्याचेच एक उदाहरण आहे. विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७चे ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.