५ जणांची २ तासांच्या शर्थीनंतर सुरक्षित सुटका. हापूर, उत्तर प्रदेश येथील घटना.

उत्तर प्रदेश : तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि स्थानिक परिस्थितीचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचे प्राण थोडक्यात वाचल्याची थरारक घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात घडली आहे. 'गुगल मॅप'ने दाखवलेला रस्ता फॉलो करताना एका कुटुंबाची कार रात्रीच्या अंधारात थेट पाण्याच्या मोठ्या नाल्यात कोसळली. या कारमध्ये महिला आणि लहान मुलांसह पाच जण अडकले होते. अग्निशामक दल आणि पोलिसांनी तब्बल दोन तास चालवलेल्या बचाव मोहिमेनंतर (रेस्क्यू ऑपरेशन) सर्वांची सुखरूप सुटका केली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील दाद्री भागातील रहिवासी असलेला साहिल हा आपल्या कुटुंबासह मेरठमधील किथोर येथे एका लग्नकार्यासाठी जात होता. दिल्ली फाटक ओव्हर ब्रिजजवळील रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे बंद होता. त्यामुळे साहिलने पर्यायी मार्गासाठी गुगल मॅपची मदत घेतली.
मॅपने दाखवलेल्या रस्त्याने जात असताना आनंद विहार योजनेच्या शामनगर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते. रात्रीच्या अंधारामुळे साहिलला पाण्याचा अंदाज आला नाही. ते नेहमीसारखे साचलेले पाणी असून कार सहज पुढे जाईल, असा त्याचा अंदाज होता. मात्र, कार पुढे नेताच ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खोल आणि चिखलमय नाल्यात घसरली.
कार नाल्यात पडताच गाडीच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे कारचे सर्व दरवाजे आपोआप लॉक झाले आणि खिडक्याही बंद झाल्या. चिखल आणि पाण्यामुळे कुटुंबाला बाहेर पडणे अशक्य झाले, ज्यामुळे कारमध्ये एकच घबराट निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहिल्यानंतर तातडीने '११२' क्रमांकावर फोन करून पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशामक अधिकारी आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कार पाण्यात बरीच रुतली असल्याने बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक होते. अखेर जवानांनी कारच्या खिडक्या आणि इतर भाग तोडून आतील पाचही जणांना एक-एक करून सुरक्षितपणे बाहेर काढले. सुमारे दोन तास चाललेल्या या थरारक मोहिमेनंतर सर्वांना वाचवण्यात यश आले असून, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
सुरक्षित सुटकेनंतर या कुटुंबाने पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांचे मनापासून आभार मानले.