मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा

पणजीः गोवा सरकारने (Goa Government) ३०० युनीट वीज मोफत देऊन मागील वीज बिले माफ करावीत. तसेच २४ तास विजेचा पुरवठा सुनिश्चित करावा. आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना सहकार्य करायला तयार आहे. आम्ही सरकारला ३१ जुलै पर्यंतची मुदत देतो. आणि जर या मागण्या पूर्ण न झाल्यास जनआंदोलन होणार, असा इशारा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.
दोनापावल येथे आप पक्षाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल बोलत होते. यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मारलेना, बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस, आपचे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि इतर नेते उपस्थित होते.
सध्या गोव्यात वीज पुरवठा व्यवस्थित नाही पण बिले येतात त्यासाठी लोक चवथाळले आहेत. त्यांचे स्वत:चे मंत्री दिगंबर कामत यांनी जास्त रकमेच्या वीज बिलांचा विषय घेऊन सांगितले आहे की, एक खोली असलेल्या घरांना ३ हजार ते ५ हजारपर्यंत वीज बिले आली आहेत, असे केजरीवाल यांनी सांगितले.
वाढीव बिले येण्यामागे अनेक कारणे आहेत. काहीजणांना चुकीची बिले आली आहेत आणि ती दुरुस्त करण्यासाठी त्यांना चपला झिजवाव्या लागत आहेत. काहीजणांना दंड पडला आहे. काहीजणांचा लोड वाढला आहे. अशी १०० कारणे आहेत. ही बिले भरणे गोमंतकीयांना शक्य नाही आणि आकारेल्या दंडावर व्याज दर महिन्याने वाढत आहे. त्यासाठी लोक चिंतेत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला. गोव्यात मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू आहे. गोवा सरकारने विधानसभेत मांडलेल्या डेटानुसार गोव्यात जानेवारी २०२४ ते मे २०२५ या सोळा महिन्यांत १९ हजार वेळा वीज गायब झाली. गेल्या तीन महिन्यांत दर दिवशी वीज गायब झाली आहे. गोवा हे वीज गायब होण्याचे राज्य झाले असल्याचा टोमणा केजरीवाल यांनी मारला.
त्यासाठी आम्ही सरकारकडे स्पष्ट तीन मागण्या ठेवतो. प्रथम मागणी दिल्ली आणि पंजाबसारखे ३०० युनीट पर्यंत वीज मोफत द्यावी. गोव्याचा अर्थसंकल्प ३० हजार कोटींचा आहे. ३०० युनीट मोफत दिल्यास केवळ ३०० कोटी एवढा भार सरकारवर येणार आणि केवळ १ टक्के बजेटचा वापर या योजनेवर होणार, असा युक्तीवाद केजरीवाल यांनी केला.
१५ जून पर्यंत जेवढी लोकांची बिले थकीत आहेत, ही सर्व घरगुती बिले सरकारने माफ करावीत. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांत थकीत सर्व बिले माफ झाली आहेत. आणि हे करणे शक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमंत्रण द्यावे, आम्ही त्यांना यासंदर्भात मदत करण्यास तयार आहोत, असा सल्ला केजरीवाल यांनी दिला.
गोमंतकीयांना २४ तास वीज द्यावी. गोव्यात विजेची कमतरता नाही, केवळ व्यवस्थापनात खूप त्रुटी आहेत. दिल्लीत आम्ही २४ तास सातत्याने वीज पुरवठा करून दाखवला आहे. ३ वर्षे परिश्रम घेतल्यानंतर दिल्लीत आता एकदा ही वीज जात नाही. जर या तीनही मागण्या पूर्ण झाल्या तर गोव्यातील ७६ टक्के लोकांना त्याचा फायदा होणार, असे केजरीवाल यांनी सांगितले.