एटीएस पथकाचे अधीक्षक एडवीन कुलासो निलंबित

पोर्तुगीज पासपोर्ट, दुहेरी नागरिकत्व प्रकरण

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
4 hours ago
एटीएस पथकाचे अधीक्षक एडवीन कुलासो निलंबित

पणजी : गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) अधीक्षक एडवीन कुलासो यांना सरकारने तातडीने निलंबित केले आहे. पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळवल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असून, याबाबतचा अधिकृत आदेश दक्षता खात्याचे संचालक अमरसेन राणे यांनी मंगळवारी जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अधीक्षक एडवीन कुलासो यांनी २००८ मध्ये स्वतःच्या जन्म नोंदणीची आणि त्यानंतर २००९ मध्ये आपल्या विवाहाची नोंदणी पोर्तुगालमधील लिस्बन येथे केल्याचे चौकशीत समोर आले आहे. तसेच त्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचेही उघडकीस आले आहे. या गंभीर प्रकरणाची पहिली तक्रार गृह खात्याकडे २०२१ ते २०२२ या कालावधीत आली होती. त्यानंतर गृह खात्याने या संदर्भात प्राथमिक चौकशी करून सरकारला आपला अहवाल सादर केला होता.

गृह खात्याच्या प्राथमिक अहवालानुसार, अधीक्षक एडवीन कुलासो हे प्रथम दुबईला गेले होते. त्यानंतर तिथून त्यांनी पोर्तुगीज पासपोर्टचा वापर करून पोर्तुगालचा प्रवास केल्याचे समोर आले होते. दरम्यान, पोर्तुगीज नागरिकत्व कायद्यातील नियमांनुसार, संबंधित नागरिकाला काही काळ पोर्तुगालमध्ये राहणे बंधनकारक असते. असे न केल्यास त्यांचे नागरिकत्व आणि पासपोर्ट रद्द केला जातो.

दक्षता खात्याची चौकशी आणि कारवाई

काही महिन्यांपूर्वी अधीक्षक एडवीन कुलासो हे पुन्हा पोर्तुगालला गेल्याची माहिती समोर आली होती आणि सरकारने याची गंभीर दखल घेतली होती. त्यानुसार, सरकारने दक्षता खात्याला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

दक्षता खात्याच्या चौकशीत त्यांनी परदेश प्रवासासाठी प्रथम भारतीय पासपोर्टचा वापर केला आणि त्यानंतर तिथे पोर्तुगीज पासपोर्ट वापरल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण चौकशी अहवालाच्या आधारावर, सरकारच्या आदेशानुसार दक्षता खात्याने मंगळवारी आदेश जारी करून अधीक्षक कुलासो यांना निलंबित केले आहे.

हेही वाचा